उदय कारखान्याचे सात लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचे उद्दिष्ट : मानसिंगराव गायकवाड


कोल्हापूर
 : उदय साखर कारखाना, अथणी शुगर-शाहूवाडी युनिट चालू गळीत हंगामात सात लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन करेल, असा विश्वास साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांनी व्यक्त केला. सोनवणे- बांबवडे तालुका शाहूवाडी येथे कारखाना कार्यस्थळावरील वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर दिवंगत उदयसिंगराव गायकवाड यांच्या पुतळ्याचे अनावरण दोन डिसेंबरपर्यंत केले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.

गायकवाड म्हणाले, साखर कारखान्याच्या डिस्टिलरीचे उत्पादन एक लाख लिटर क्षमतेवरून प्रतीदिन दीड लाख लिटरपर्यंत वाढवण्यात आले आहे. शेजारील कारखान्यापेक्षा जादा दर देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत. साखर कारखाना प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. आता कारखान्याच्यावतीने कामगार, सभासदांसह परिसरातील लोकांसाठी ५० बेडचे अद्ययावत हॉस्पिटल उभारले जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

रणवीरसिंग गायकवाड म्हणाले की, लवकरच कारखाना जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर असेल. सभासद, कामगार व ऊस उत्पादकांमुळे कारखाना दिवसेंदिवस नावारुपाला येत आहे. पंडितराव शेळके यांनी स्वागत केले. ज्येष्ठ संचालक महादेवराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. कारखान्याचे कार्यकारी संचालक भगवान पाटील यांनी अहवाल वाचन केले. यावेळी राजाराम चव्हाण, प्रकाश पाटील, अजित पाटील, गणपती पाटील, शामराव लाळे, शंकरराव पाटील, ललिता कांबळे, प्रल्हाद पाटील, विनोद पाटील, सदाशिव पाटील, शशिकांत पाटील, अशोक सातपुते, नंदकुमार जामदार, जगन्नाथ जोशी, कामगार युनियनचे अध्यक्ष दीपक पाटील, संदीप पाटील आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here