यूक्रेनकडे दीड वर्षांसाठी पुरेसा साखर साठा : मंत्र्यांचा दावा

किव्ह : रशियासोबत संघर्ष सुरू असतानाही युक्रेनकडे अन्नधान्याचा पुरेसा साठा आहे अशी माहिती युक्रेनचे कृषी धोरण आणि अन्नधान्य उप मंत्री तारास वायसोस्की यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. युक्रेनमध्ये दरवर्षी ८ मिलियन टन गव्हाचा वापर केला जातो. सध्या ६ मिलियन टन गहू उपलब्ध आहे. याशिवाय मक्क्याचा दोन वर्षांचा तर सूर्यफूल तेलाचा पाच वर्षांचा पुरेसा साठा आहे. साधारणतः दीड वर्षांसाठी लागेल एवढी साखरही उपलब्ध आहे असे मंत्री वायसोस्की म्हणाले.

युक्रेन आणि रशियाकडे जागतिक स्तरावरील गव्हाच्या निर्यातीचा एक तृतीयांश हिस्सा आहे. मात्र, इंडोनेशिया, इजिप्त, येमेन आणि लेबनानसह युक्रेनच्या गव्हावर अवलंबून असलेल्या देशांना अन्नधान्याची टंचाई आणि राजकीय अस्थिरतेला सामोरे जावे लागणार आहे. स्थानिक विभागीय परिषदेचे नेतृ्त्व करणाऱ्या बोगदान युस्विएक यांनी सांगितले की, ल्वीव क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावर शेती असलेल्या गावांतील १४,५०० नागरिक युद्धासाठी गेले आहेत. त्याचा थेट परिणाम शेती उत्पादनावर होणार आहे.

रशियासोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे अन्नधान्य टंचाईच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनने या महिन्याच्या सुरुवातीला साखरेसह काही अन्नधान्याची निर्यात रोखण्याचा निर्णय घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here