केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज झारखंड मधील देवघर येथे इफ्को नॅनो युरिया कारखान्याच्या पाचव्या युनिटचे भूमिपूजन करुन कोनशिला बसवली. देशाची प्रगती आणि समृद्धी यासाठी अमित शाह यांनी बाबा वैद्यनाथ मंदिरात प्रार्थना देखील केली.
याप्रसंगी केलेल्या भाषणात केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, आज येथे इफ्कोच्या नॅनो युरिया कारखान्याच्या उत्पादन युनिटची कोनशिला बसवण्यात आली आहे. द्रवरूप युरिया आपल्या देशातील मृदा संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमी संवर्धनाला मुख्य मुद्द्याचा दर्जा दिला आहे तसेच नैसर्गिक शेती असो, सेंद्रीय शेती असो किंवा नॅनो युरियाविषयक संशोधन ते उत्पादन या प्रक्रियेला गती देणे असो, पंतप्रधानांनी या विषयाला प्राधान्य दिले आहे. देवघर येथील युनिटच्या उभारणीमुळे, येथे दर वर्षी सुमारे 6 कोटी द्रवरूप युरियाच्या बाटल्यांचे उत्पादन होईल आणि यामुळे आयात केलेल्या युरियावरील आपले अवलंबित्व कमी होऊन भारत आत्मनिर्भर होईल.
द्रवरूप युरियाची अर्ध्या लिटरची छोटी बाटली एक संपूर्ण पोतंभर युरिया खताला पर्याय ठरेल अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की देशात अनेक ठिकाणी, शेतकरी युरिया खत आणि द्रवरूप युरिया अशा दोन्हींचा शिडकावा करतात आणि त्यामुळे पिके आणि जमीन या दोन्हींची हानी होते. द्रवरूप युरियाच्या फवारणीनंतर पिकांच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता शाह यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, भूमातेच्या संवर्धनासाठी नॅनो द्रवरूप युरिया विकसित करण्याचे संशोधनकार्य हाती घेण्यात आले. जमिनीत असलेले गांडुळ नैसर्गिकरीत्या खतांचे उत्पादन करतात मात्र रासायनिक खतांच्या वापरामुळे गांडुळ मरतात. द्रवरूप युरियाच्या फवारणीमुळे मृदा विषारी होत नाही अशी माहिती त्यांनी दिली.
जर आपल्या देशाच्या कृषी क्षेत्रात होणारा रासायनिक तसेच युरिया खतांचा वापर थांबवला नाही तर जगातील इतर अनेक देशांप्रमाणे आपल्या देशातील जमिनीच्या उत्पादकतेवर विपरित परिणाम होईल अशी भीती केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली. इफ्फ्को या शेतकऱ्यांच्या सहकारी कंपनीने जगात प्रथमच द्रवरूप नॅनो युरिया तयार केला आहे आणि आता ही कंपनी डीएपी अर्थात डाय-अमोनियम फॉस्फेटच्या उत्पादनाकडे वळली आहे असे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सांगितले.
(Source: PIB)