महाराष्ट्रात काही कारखान्यांकडून विनापरवाना ऊस गाळप : मीडिया रिपोर्ट

पुणे : विना परवाना ऊस गाळप करणाऱ्या १३ साखर कारखान्यांची ओळख साखर आयुक्त कार्यालयाने पटवली आहे. गेल्या काही दिवसांपासून हे कारखाने गाळप करीत आहेत.

यासंदर्भात दी इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, साखर आयुक्त कार्यालयाद्वारे या कारखान्यांच्या मुख्य व्यवस्थापनाला नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यात साखर कारखान्यांना गाळप परवाना घेण्यासाठी अर्ज करावा लागतो. सरकारकडून तारीख निश्चित केल्यानंतर उसाचे गाळप करता येते. परवान न घेता गाळप केल्यास प्रती टन ५०० रुपये दंडासह कारवाई केली जाते. या हंगामाच्या सुरुवातीला दोषी आढळणाऱ्या कारखान्यांच्या प्रशासनाविरोधात गुन्हे दाखल करण्याचा निर्णय साखर आयुक्त कार्यालयाने घेतला आहे.

साखर आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा प्रकरणात १३ कारखाने आढळले आहेत. त्यातील बहुतांश पुणे जिल्ह्यातील आहेत. तर उर्वरीत सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील आहेत. त्यांना परवाने देण्यात आलेले नाहीत. तरीही ते ऊस गाळप करीत आहेत. या हंगामात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कारखान्यांना गाळप परवाना घेण्यापूर्वी शेतकऱ्यांना शंभर टक्के एफआरपी अदा करण्याचे निर्देश दिले होते.

दरम्यान, महाराष्ट्रातील गळीत हंगामाने वेग घेतला आहे. साखर आयुक्त कार्यालयाकडील आकडेवारीनुसार १४ नोव्हेंबर २०२१ अखेर राज्यात १३१ साखर कारखाने सुरू झाले आहेत. त्यामध्ये ६२ सहकारी तर ६९ खासगी आहेत. आतापर्यंत ९७.७१ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्याने आतापर्यंत ९३.६१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. राज्याचा सर्वसाधारण साखर उतारा ८.६५ टक्के इतका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here