युपी : बुधवाल साखर कारखाना पुन्हा सुरू होण्याची शक्यता

बाराबंकी : गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेला बुधवाल साखर कारखाना पुन्हा सुरू होण्याच्या शक्यतेने ऊस उत्पादक शेतकरी आनंदले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीपीपी तत्त्वावर साखर कारखाना सुरू करण्यासाठी ५० कोटींची तरतूद केली होती. रामनगरचे उप जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखान्याच्या जमिनीवरील बेकायदेशीर अतिक्रमण हटवून जमीन सुरक्षित केली आहे. चारही बाजूंनी लोखंडी अँगल लावून तारांचे बॅरिकेडिंग करण्यात आले आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बुधवार साखर कारखाना गेली १६ वर्षे बंद आहे. या कारखान्याचा मुद्दा शेतकऱ्यांनी रामनगर भागातील निवडणूक प्रचारसभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर मांडला होता. त्यांनी साखर उद्योगाच्या विशेष सचिवांना याबाबत सांगितले होते. पीपीपी मॉडेलद्वारे खाजगी व्यवस्थापनाकडे साखर कारखाना सुरू केला जाईल, तर शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे असे सांगण्यात आले.

साखर कारखान्याची स्थापना १९३१ मध्ये जवळपास १३.२४ हेक्टर जमिनीवर कानपूरच्या सेठ दयाराम आणि दुर्गाशंकर यांनी केली होती. उत्तर प्रदेश स्टेट शुगर कॉर्पोरेशनद्वारे चालवला जाणारा हा कारखाना १९९५ पासून सलग सुरू होता. तो २००७ मध्ये तोट्यामुळे बंद पडला. आता बुधवल ऊस समितीमध्ये ७,८०० शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. रामनगर परिसरात सुमारे साडेचार हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी ऊस पिक घेतले आहे. त्यामुळे लोकांना रोजगाराच्या संधीही मिळतील, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here