उत्तर प्रदेश : साखर कारखान्यांकडे ४,८३२ कोटींची ऊस बिले थकीत

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांकडे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ४,८३२ कोटी रुपये थकीत आहेत. साखर हंगाम २०२१-२२ मधील एक सप्टेंबरपर्यंतची ही थकबाकीची रक्कम आहे. सरकारने हंगामातील ८६.२७ टक्के म्हणजेच ३०,३६८ कोटी रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आतापर्यंत दिले आहेत, असे केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी म्हटले आहे.बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांना आठ सप्टेंबर रोजी पाठवलेल्या पत्रातून ही माहिती उघड झाली आहे.

खासदार अली यांनी सोशल मीडियावरुन ही माहिती दिली. त्यांनी ट्वीटरवर हे पत्र सादर केले. अली यांनी पाच ऑगस्ट रोजी लोकसभेतही ऊस बिल थकबाकीचा मुद्दा उपस्थित केला होता. गळीत हंगाम ऑक्टोबर २०२१ – सप्टेंबर २०२२ यामध्ये कारखान्यांकडून ३५,२०१.२२ कोटी रुपयांच्या उसाची खरेदी करण्यात आली होती. त्यापैकी ३०,३६८.७३ कोटी रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत. तर अद्याप ४,८३२.४९ कोटी रुपये अद्याप थकीत आहेत. ही रक्कम एक सप्टेंबरपर्यंतची आहे. सिंभावली साखर कारखान्याने २६३.६० कोटी रुपये ऊस उत्पादकांना दिले आहेत. मात्र, कारखान्याकडे अद्याप २३८.०९ कोटी रुपये थकीत असल्याचे मंत्री ज्योती यांनी पत्रात म्हटले आहे.

कारखान्याला याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून उत्पादकांचे पैसे गतीने दिले जावेत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पत्रात म्हटले आहे. मात्र, खासदार अली यांनी कारखाने ऊस उत्पादकांची अडवणूक करीत असल्याचे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here