उत्तर प्रदेश: ऊस बिले थकविणाऱ्या कारखान्याच्या कार्यकारी संचालकांसह सहा अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

कासगंज, उत्तर प्रदेश: साखर कारखान्याकडे आर्थिक वर्ष २०२१-२२ मधील जवळपास ३५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. प्रशासनाने याबाबत वारंवार निर्देश दिले आहेत. नोटिसा बजावल्या तरीही कारखान्याने याची दखल घेतली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी हर्षिता माथुर यांच्या निर्देशानंतर जिल्हा ऊस विकास सहकारी समितीचे सचिव अशोक कुमार यांनी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि व्यवस्थापन विभागातील सहा अधिकाऱ्यांच्या विरोधात फसवणूक, जीवनावश्यक वस्तू अधिनियम आदी अंतर्गत सोरोंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्हा ऊस विकास सहकारी समितीचे सचिव अशोक कुमार यांनी तक्रारीत म्हटले आहे की, गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये कारखान्याकडे ऊस बिलाची ३५.३० कोटी रुपयांची थकबाकी आहे. शिवाय कारखान्याकडे ८२.२२ लाख रुपये ऊस विकास अनुदान थकीत आहे. सरकारने वारंवार निर्देश दिल्यानंतरही कारखान्याने ऊस बिले दिलेली नाहीत. ऊस नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे न्यौली साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक कुणाल यादव, सरव्यवस्थापक (शुगर सेल) चंद्रभान सिंह, अकाऊंट विभागाचे सरव्यवस्थापक अमित मेहरा, मुख्य वित्त अधिकारी डी. के. श्रीवास्तव, उपाध्यक्ष तेजवीर ढाका, युनिट हेड इसरार अहमद यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ऊस विभागाकडून इतर कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here