मुरादाबाद : गेल्या पाच-सहा वर्षात कुंदरकी-डिंगरपूर या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. रस्त्यावर जवळपास दोन – दोन फूट खोल खड्डे आहेत. अनेक ठिकाणी तर रस्ता आहे की नाही हेच समजून येत नाही. रस्त्यावरून ये-जा करणे धोकादायक बनले आहे. त्यामुळे या मार्गावर राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कठीण परिस्थिती आहे. ऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वाधिक त्रास सोसावा लागत आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकरी जेव्हा या मार्गावरून ट्रॅक्टरमध्ये ऊस घेवून प्रवास करतात, तेव्हा खड्ड्यांमुळे अनेकदा गाडी उलटते. त्यातून मोठे नुकसान होते. व्यापाऱ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वांनी रस्ता दुरुस्तीसाठी अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदने दिली आहेत. मात्र रस्ता दुरुस्त झालेला नाही. कुंदरकी-डिंगरपूर रस्त्यावरून अनेक शेतकरी आपला ऊस घेवून बिलारी कारखान्याला जातात. मात्र, या खराब रस्त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ऊस लावणेच कमी केले आहे. शेतकरी म्हणतात की, अनेकवेळा ट्रॅक्टर उलटून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शिवाय, जीवाला धोका आहे. त्यामुळे या भागातील ऊस शेती कमी होत आहे.