युपी : साखर कारखान्याने बिले थकवली, पुराने कमाई गमावली, २५ हजार शेतकरी संकटात

मुजफ्फरनगर : हिंडन नदीच्या पुराने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. चारा टंचाईचे संकट आहे. ऊस पिकही धोक्यात आले आहे. शेतीवर गुजराण करणाऱ्या शेतकऱ्यांची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. मुलांचे शिक्षण, औषधोपचार आणि इतर खर्चामुळे संकट वाढले आहे. याशिवाय साखर कारखान्याने बिले थकवली आहेत. त्यामुळे जवळपास २५ हजार शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, टाडा गावातील शेतकरी कृष्णपाल यांनी सांगितले की, त्यांच्याकडे जवळपास आठ एकर जमीन आहे. त्यांची पत्नी आजारी असते. साखर कारखान्याकडून गेल्यावर्षीचे पैसे मिळावेत यासाठी ते धरणे आंदोलनात सहभागी झाले. जोरदार पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. आता मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक अडचणी भेडसावत आहेत. चंधेडी गावातील शेतकरी फेरू सिंग यांनी सांगितले की, ऊसाची बिले थकल्याने त्यांनी धरणे आंदोलन केले आहे. हिंडन नदीच्या पुराने सर्व मेहनत वाया गेली आहे. सारे पिक पाण्यात बुडाले आहे. विज खात्याने कनेक्शन तोडले आहे. किसान क्रेडिट कार्डसाठी पैसे कोठून जमवायचे असा प्रश्न त्यांना सतावत आहे.

चंधेडी गावातील शेतकरी प्रवीण यांची अशीच परिस्थिती आहे. अलीपूर अटेरना गावातील शेतकरी राजबीर यांनी शेतातील मजुरीचा खर्चही निघाला नसल्याचे सांगितले. दरम्यान, मुजफ्फरनगरचे जिल्हा ऊस अधिकारी संजय सिसौदीया यांनी सांगितले की, भैसानातील बजाज साखर कारखान्यावर १६२ कोटी रुपयांची थकबकी आहे. आतापर्यंत कारखान्याने १७५ कोटी रुपयांची बिले दिली आहेत. साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी लवकर बिले द्यावीत यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here