वॉशिंग्टन /नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानने आपल्या वादग्रस्त मुद्यांवर थेट संवाद साधवा पाहिजे असे अमेरिकेने म्हटले आहे. मात्र, पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाने अलिकडेच घेतलेल्या निर्णयावर टिपणी करण्यास अमेरिकेच्या विदेश विभागाने नकार दिला.
अलिकडेच पाकिस्तानने भारताकडून साखर आणि कापूस आयात करण्याचा आपला निर्णय मागे घेतला. अमेरिकेच्या विदेश विभागाचे प्रवक्ता नेड प्राइस यांनी आपल्या दैनंदिन वार्तालापात पत्रकारांना सांगितले की, मी त्यावर काही खास टिप्पणी करू इच्छीत नाही. एका प्रश्नाच्या उत्तरात प्राइस यांनी म्हटले होते की, आम्ही भारत आणि पाकिस्तान दरम्यान थेट संवादाचे समर्थन करतो. एक एप्रिल रोजी पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाने भारताकडून कापूस आणि साखर आयात करण्याचा उच्चस्तरीय समितीचा प्रस्ताव धुडकावून लावला. याबाबत परराष्ट्र मंत्री शाह महमुद कुरेशी यांनी सांगितले की, जोपर्यंत भारत जम्मू-काश्मीरबाबतचा आपला निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत दोन्ही देशांमध्ये कोणत्याही प्रकारचे संबंध प्रस्थापित होऊ शकणार नाहीत.