नवी दिल्ली : उत्तर भारतातील राज्यांमध्ये पावसाच्या घडामोडी सुरू आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौसह राज्यभरातील विविध जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहेत. जोरदार पावसामुळे युपीमध्ये गेल्या २४ तासांत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. लखनौमध्ये एका निर्माणाधीन इमारतीची भिंत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला. लखनौसह राज्यात विविध ठिकाणी जोरदार पावसामुळे पाणी साठले आहे. तर आणखी काही दिवस पावसापासून दिलासा मिळणार नाही, असा इशारा, आयएमडीने दिला आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, बंगालच्या खाडीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंडमधील काही जिल्ह्यांना आयएमडीने इशारा दिला आहे. दिल्ली एनसीआर आणि उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांत तापमान घसरल्याची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, युपी, बिहार, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि ओडिशात आज, १७ सप्टेंबर रोजीही जोरदार पाऊस कोसळू शकतो. गोरखपूर, संतकबीर नगर, कुशीनगर, सिद्धार्थनगर, गोंडा आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी शनिवारी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर बिजनौर, मुरादाबाद, रामपूर, बरेली, पीलीभीत, शाहजहांपूर, लखीमपूर खीरी, बहराइच, बलिया, गाजीपुर आणि आसपासच्या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.