उत्तर प्रदेश: ३० डिसेंबरअखेर सर्व कारखाने शंभर टक्के ऊस बिले देणार

बागपत : राज्यात ३० डिसेंबरअखेर सर्व साखर कारखान्यांकडून १०० टक्के ऊस बिले अदा केली जातील, अशी घोषणा ऊस मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी यांनी केली. १९६१ मध्ये स्थापन झालेल्या बागपत सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगाम सत्राचा प्रारंभ ऊस मंत्री चौधरी यांनी केला. यावेळी २०२४ पर्यंत या कारखान्याची क्षमता वाढ केली जाईल असे त्यांनी सांगितले. शुक्रवारी बागपत सहकारी साखर कारखान्यात ऊस मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी, राज्यमंत्री के. पी. मलिक, खासदार डॉ. सत्यपाल सिंह, आमदार योगेश धामा, जिल्हाधिकारी राज कमल यादव, कारखान्याचे सरव्यवस्थापक व्ही. के. पांडे यांनी पूजा-अर्चा करून गव्हाणीत ऊस टाकून गळीत हंगामास औपचारिक सुरुवात केली.

जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मंत्री चौधरी यांनी सांगितले की, जे शेतकरी ऊस शेती करू इच्छितात, त्यांनी बागपतमधील ऊस शेती पाहिली पाहिजे. जशा प्रकारे आपण देवाचे दर्शन घेण्यासाठी काशी, मथुरा, रामेश्वरमला जातो, तशाच प्रकारे बागपत देशातील शेतकऱ्यांचे मंदिर आहे. ही चौधरी चरण सिंहांची भूमी आहे. बागपतचा गेल्या आठ वर्षात जेवढा विकास झाला, तेवढा गेल्या १०० वर्षात होवू शकला नव्हता. बागपतसह राज्यातील ७४ कारखान्यांनी १०० टक्के ऊस बिले आणि २४ कारखान्यांनी ९० टक्के ऊस बिले दिली आहेत. इतर कारखान्यांनी ५० टक्के बिले दिली आहेत. काही खासगी कारखानदार ऊस बिले देण्यास टाळाटाळ करतात. मात्र, अशांवर कारवाई केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here