उत्तर प्रदेश : मुख्यमंत्री योगी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देणार ‘गोड’ बातमी

लखनौ : उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आगामी गळीत हंगामासाठी उसाच्या आधारभूत किमतीत (SAP) वाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीअगोदर शेतकऱ्यांना ‘गोड’ भेट मिळणार आहे.

राज्य सरकार आज (४ सप्टेंबर) उसाच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. उसाच्या आधारभूत किमतीत वाढ करण्यावर एकमत झाल्याचे समजते. याबाबतचा प्रस्ताव तयार झाला असून मंत्रिमंडळाची मंजुरी मिळताच त्याची अंमलबजावणी केली जाईल. उसाच्या समर्थन मूल्यात प्रती क्विंटल २५ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

राज्य सरकारने २०२१ च्या शेतकरी आंदोलनादरम्यान, उसाच्या आधारभूत किमतीत वाढ केली होती. त्यावेळीही २५ रुपये प्रती क्विंटल वाढ केली होती. यंदाच्या गळीत हंगामापासूनच दरात वाढ होणे अपेक्षित आहे. उत्तर प्रदेश हा देशातील सर्वात मोठा ऊस उत्पादक आहे. राज्यात जास्तीत जास्त क्षेत्रात उसाचे पीक घेतले जाते. देशात पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उसाची आधारभूत किंमत हा महत्त्वाचा मुद्दा ठरण्याची शक्यता असल्याने सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी मोठी घोषणा करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here