उत्तर प्रदेश : ऊस दर आणि साखर कारखान्यांच्या आर्थिक स्थितीवरून काँग्रेसचा भाजपवर निशाणा

नवी दिल्ली : यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून ऊस आणि साखर उद्योगाचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जात आहे. काँग्रेस केंद्र व राज्य सरकारवर ऊसाची थकबाकी आणि इतर मुद्द्यांवरून टीका करीत आहे. अमरोहा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक रॅलीपूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सरकारवर हल्लाबोल केला. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे ऊस उत्पादक राज्य आहे आणि तरीही भाजप सरकारने उसाच्या दरात वाढ करण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे, असे ते म्हणाले.

जयराम रमेश यांनी X वरील आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, उत्तर प्रदेशात उसाचा दर ३६० रुपये प्रती क्विंटल आहे, जो पंजाबमधील प्रती क्विंटल ३८६ रुपये आणि हरियाणातील ३९१ रुपये प्रती क्विंटलपेक्षा खूपच कमी आहेत. ऊस दर कीटकनाशकांच्या वाढत्या किमतींशी, महागाईशी ताळमेळ राखण्यात अपयशी ठरत असून, त्यामुळे शेतकरी आता त्रस्त आहेत. गेल्या तीन वर्षांत लागवडीखालील क्षेत्र सुमारे ४००० हेक्टरने घटले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

उसाची देणी देता येत नसल्यामुळे साखर कारखानदारांची आर्थिक स्थिती बिकट असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. उसाच्या तुटवड्याच्या काळात, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर बिले देण्यासाठी कारखानदार संघर्ष करत आहेत आणि काही कारखाने कायमस्वरूपी बंद होण्याची भीती आहे, असे रमेश म्हणाले. ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखान्यांतील कामगारांचे जीवन या दुष्टचक्रामुळे धोक्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मात्र भाजप सरकार कुठेच दिसत नाही. यूपीमधील ऊस उत्पादक शेतकरी आणि गिरणी कामगारांना पाठिंबा देण्यासाठी भाजप सरकार काय करत आहे? अशी विचारणा रमेश यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here