उत्तर प्रदेश : ऊस थकबाकीबाबत १५ जुलै रोजी आंदोलनाचा शेतकऱ्यांचा निर्णय

लखनौ : ऊस बिले मिळण्यास झालेल्या विलंबामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी सीतापूर जिल्ह्यातील महमूदाबाद सहकारी साखर कारखान्यासमोर निदर्शने केली. या महिन्याच्या सुरुवातीला ऊस गाळप हंगाम संपला. मात्र १५ कोटी रुपयांपेक्षा जास्त ऊस बिले थकीत आहेत असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या नियमांनुसार ऊस खरेदीच्या १४ दिवसांच्या आत उत्पादक शेतकऱ्यांना उसाचे बिल मिळाले पाहिजे. या नियमांचे पालन व्हावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. धान्य मार्केटमध्ये जमलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी मोर्चा काढला. यावेळी त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही केली. यंदा गहू, मोहरी, बटाटा या पिकांचे नुकसान झाले असून, त्यातच आता उसाची बिले रखडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

न्यूजक्लिकमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार आंदोलकांनी सांगितले की, सरकारने शेतकऱ्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष केले आहे. जवळपास महिनाभरापासून आम्ही धरणे आंदोलन करीत आहोत. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. किसान मंचचे जिल्हा सचिव अंबुज श्रीवास्तव म्हणाले, दरवर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या बिलांसाठी आंदोलन करावे लागते. शेतकऱ्यांना त्यांचा खर्च भागवण्यासाठी पैशांची गरज आहे. आम्हाला केवळ आश्वासन दिले जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. बिलांसाठी १५ जुलै रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here