लखनौ : राजधानी लखनौतील रेशन कार्डधारक कुटुंबांना मोफत गहू, तांदळाचे वितरण केले जाणार आहे. या महिन्यापासून राजधानी लखनौमधील ७.९३ लाख कार्डधारक कुटुंबांना मोफत गहू, तांदळाचे वितरण केले जाणार आहे. गरीब लाभार्थ्यांवरचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी डिसेंबर २०२३ पर्यंत, संपूर्ण वर्षभर गहू आणि तांदळाचे मोफात वितरण केले जाईल. केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियमांतर्गत सर्व लाभार्थ्यांना वर्षभर मोफत धान्य वितरण केले जाणार असून याची घोषणा केल्यानंतर पुरवठा विभागाने तयारी सुरू केली आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आतापर्यंत सर्व कार्डधारकांना एनएफएसए अंतर्गत गहू २ रुपये किलो तर तांदूळ ३ रुपये किलो दराने दिला जातो. मका १ रुपये किलो दराने वितरीत करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत अंत्योदय कार्डधारकांना ३५ किलो धान्य मिळते. पात्र कुटुंबाला प्रती युनिट पाच किलो रेशन मिळते. या योजनेंतर्गत अंत्योदय आणि पात्र घरगुती कार्डधारक अशा दोन्ही श्रेणीतील व्यक्तींना योजनेचा लाभ दिला जाईल. डीएसओ सुनील कुमार सिंह यांनी सांगितले की, वन नेशन वन रेशन कार्ड योजनेअंतर्गत सर्व कार्डधारकांना पोर्टेबिलिटीचा लाभही मिळेल.