उत्तर प्रदेश: ऊसाच्या तोलाईस उशीर झाल्याने संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन

लखनऊ: तीन वादग्रस्त कृषी विधेयकांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनापाठोपाठ पश्चिम उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यात उसाच्या तोलाईस उशीर झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन केले भारतीय किसान युनीयनचे (बिकेयू) नेते राकेश टिकैत यांच्या मूळ गावात ऊस वजनाबाबत स्थानिक साखर कारखान्यांकडून होणाऱ्या टाळाटाळ विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले. सकाळी संतप्त शेतकऱ्यांनी आपले ऊसाने भरलेले ट्रॅक्टर हायवेवर उभे केले. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, ऊस वजन करण्यास उशीर होत असल्याने शेतकरी संतप्त आहेत. शेतकरी अभिमन्यू चौधरी म्हणाले, गेल्या तीन दिवसांपासून मी ऊस वजन करण्याच्या प्रतिक्षेत आहे. मला माझा ऊस साखर कारखान्याला नेण्यासाठी आणखी एक ते दोन दिवस लागतील अशी शक्यता वाटते.

शोरम गावातील शेतकरी चौधरी यांनी सांगितले की, मला बुढाना तालुक्यातील या साखर कारखान्यापर्यंत पोहोचण्यासाठी ४० किलोमीटरहून अधिक प्रवास करावा लागला आहे. केवळ मी नव्हे तर मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्या उसाच्या वजनाच्या प्रतीक्षेत आहेत. कडकडीत उन्हामुळे ऊस वाळत आहे. त्यामुळे जेव्हा हा ऊस कारखान्याला पोहोचेल, तेव्हा याचे वजन कमी होते. त्यातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो.

चौधरी यांच्याप्रमाणे शेकडो शेतकरी ट्रॅक्टर, ट्रॉली घेऊन वजन करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. बहुसंख्य ट्रॅक्टरमध्ये सरासरी ३०० क्विंटल ऊस आहे. बिकेयूचे नेते नरेश चौधरी म्हणाले, पूर्ण उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांचे किमान १२००० कोटी रुपये थकीत आहेत. शेतकऱ्यांना उसाला योग्य दरही मिळत नाही. शिवाय, जो दर मिळतो, त्याचे पैसेही वेळेवर मिळत नाहीत अशी स्थिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here