मुजफ्फरनगर : मुजफ्फरनगर जिल्ह्यातील ५० हजार शेतकऱ्यांचा जवळपास एक कोटी क्विंटल अतिरिक्त ऊस अद्याप तोडणीविना शेतात उभा आहे. मार्च महिन्याचा दुसरा आठवडा सुरू असला तरी आतापर्यंत साखर कारखान्यांना अतिरिक्त उसाची वाटप प्रक्रिया सुरू झालेली नाही. दरवर्षी साखर कारखाना आणि ऊस विभाग अतिरिक्त उसाचा सर्व्हे करतो. मात्र, अद्याप सर्व्हे सुरू झालेला नाही.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यात ऊस हेच मुख्य पिक आहे. एकूण दोन लाख दहा हेक्टर शेतजमिनीपैकी एक लाख ७१ हजार २३६ हेक्टरवर ऊस शेती केली जाते. एकूण १५ कोटी क्विंटल उसाचे उत्पादन होते. जवळपास साडेनऊ कोटी क्विंटल ऊस साखर कारखान्यांना पाठवला जातो. गळीत हंगामाच्या सुरुवातीला कारखान्यांना जेव्हा उसाचे वाटप झाले, तेव्हा शेतकऱ्यांकडे जवळपास एक कोटी क्विंटल अतिरिक्त ऊस शिल्लक राहिला. त्यामुळे जवळपास ५० हजार शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकरी विजयपाल, विकास, मिंटू यांनी सांगितले की, अद्याप कृषी विभागाचा सर्वे सुरू झालेला नाही. तर जिल्हा ऊस अधिकारी ओमप्रकाश सिंह यांनी सांगितले की, जिल्ह्यातील एका कारखान्याचा दहावा आठवडा सुरू आहे. २५मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतांचे सर्वेक्षण केले जाईल. त्यानंतर कारखान्यांना अतिरिक्त ऊस वाटप होईल. जिल्ह्यात २०२१-२२ मध्ये ९.८२ कोटी क्विंटल उसाचे गाळप झाले होते. तर यंदा आतापर्यंत साडेसात कोटी क्विंटल उसाचे गाळप झाले आहे.