उत्तर प्रदेश: साखर कारखान्यांसह ऊस संशोधन केंद्रात विद्यार्थ्यांना इंटर्नशीपची परवानगी

लखनौ : उत्तर प्रदेशमधील विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी साखर कारखाने तसेच ऊस विभागाच्या संस्थांमध्ये इंटर्नशीप करू शकतील. ही इंटर्नशीप किमान २१ दिवस आणि जास्तीत जास्त ६० दिवसांची असेल. त्यामध्ये ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य आहे.

राज्य सरकारच्या उच्च शिक्षण विभागाने उच्च शिक्षण संचालकांना साखर उद्योग तथा ऊस विकास विभागाच्यावतीने तयार केलेल्या इंटर्नशीप प्रोग्रॅमचा लाभ विद्यार्थ्यांना देण्याचे निर्देश दिले आहेत. संचालनालयाच्या स्तरावर राज्यातील सर्व विद्यापीठांतील कुलसचिव तसेच सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना याबबतचे पत्र पाठविण्यात येत आहे.
इंटर्नशिप प्रोग्रॅम अंतर्गत पदव्युत्तर आणि पदवी तसेच समकक्ष व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. कृषी, लेखा, विधी, कम्प्युटर, पत्रकारिता, साखर, तांत्रिक, अभियांत्रिकी, सांख्यिकी अशा विविध विषयांसंबंधी हे प्रशिक्षण असेल.

मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हील, इंन्स्ट्रूमेंटेशन, पर्यावरण, शुगर टेक्नालॉजी, अल्कोहल टेक्नालॉजी, सीए, एमबीए व कृषी आदी विषयांशी संबंधित विद्यार्थ्यांना सहकारी साखर कारखाने संघ आणि राज्य साखर महामंडळातर्फे चालविल्या जाणाऱ्या कारखान्यात इंटर्नशीपची संधी मिळेल. या संस्थांमध्ये यासाठीचा कोटाही मंजूर केला जाईल.
इंटर्नशीप करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आधीच्या सेमिस्टर परीक्षेत किमान ५५ टक्के गुण मिळवावे लागतील, अशी अट ऊस विभागाने घातली आहे. इच्छुकांना ऊस विभागाच्या वेबसाइटवर यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. विद्यार्थी एकदाच अर्ज करू शकतील. त्याच्या मंजुरीची माहिती दिली जाईल. इंटर्नशीपमध्ये विशेष कौशल्ये, व्यावसायिक व व्यावहारिक अनुभव याविषयी माहिती दिली जाईल. इंटर्नशीप पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र विभागाकडून दिले जाणार आहे.

उत्तर प्रदेश ऊस समिती संघ लिमिटेड, लखनौ, उत्तर प्रदेश ऊस संशोधन परिषद शाहजहांपूूर, उत्तर प्रदेश ऊस विकास संस्था, लखनौ, साखर आयुक्त संघ, ऊस आयुक्त संघ, उत्तर प्रदेश सहकारी साखर कारखाना संघ, लखनौ आणि उत्तर प्रदेश राज्य साखर महामंडळ लिमिटेड लखनौ येथे इंटर्नशीप करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here