काशीपूर : काशीपूर विभागातील अनेक गावांमध्ये ऊस पिकावर लाल सड रोगाचा फैलाव झाला आहे. या परिसरातील किलावली, गढीनेगी, मालधनचौड, कुंडेश्वरीसह मानपूर विभागातील अनेक गावांत लाल सड रोगाचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती मिळाली आहे. ऊस तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना उपचाराबाबत माहिती दिली जात आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी डॉ. जितेंद्र क्वात्रा यांनी सांगितले की, जुलै-ऑगस्टमध्ये या रोगाला सुरुवात होते. आधी उसाची पाने आतील बाजूने लाल रंगाची दिसू लागतात. त्यानंतर ही पाने वाळतात. पानावर लाल डाग दिसतात. त्यामुळे उसामधील रस आटतो. साखर कारखाने असा ऊस स्वीकारत नाहीत. उसाच्या सीओ २३८ या प्रजातीवर लाल सड रोगाचा अधिक फैलाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उसाची निरोगी प्रजाती निवडावी. लाल सड रोगाला रोखण्यासाठी ऊस बियाण्यावर गरम पाण्याचा लागणीवेळी वापर करावा. शेतकऱ्यांनी दरवर्षी ऊसाचे वाण बदलावे. तसेच रोगग्रस्त ऊस काढून टाकावा, अशी सूचना करण्यात आली आहे. याशिवाय कीटकनाशकांच्या वापराबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे.