उत्तराखंड: साखर कारखान्यातील आगीने ऊस गाळप ठप्प

जसपूर : नादेही साखर कारखान्यात टर्बाइनमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. कारखान्याचे कर्मचारी आणि शेतकऱ्यांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. आग लागल्याने ऊसाचे गाळप आणि साखर उत्पादन ठप्प झाले आहे. यादरम्यान अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. कारखान्यातून कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कार्यालयास कुलूप ठोकले. घटनास्थळी आलेल्या आमदारांनी शेतकरी आणि कारखाना व्यवस्थापनाशी चर्चा करून तोडगा काढला. कारखान्याचे कार्यकारी संचालकांनी ऊस गाळप लवकर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गुरुवारी शॉर्टसर्किट झाल्याने टर्बाइनला आग लागली. टर्बाइनमधील डिझेल आणि बगॅसने पेट घेतल्याने आग पसरली. यादरम्यान, कारखान्याचे कर्मचारी आणि केन यार्डवर ऊस घेवून आलेल्या शेतकऱ्यांनी सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत एक शेतकरी अडकला होता. त्याची सुटका करण्यात आली. टर्बाइनच्या आगीमुळे विजेचे उत्पादन खंडित झाल्याने साखर उत्पादन आणि ऊस गाळप बंद पडले. कारखान्याचे कार्यकारी संचालक विवेक प्रकाश यांनी घटनास्थळी पोहोचून माहिती घेतली. मुख्य अभियंत्यांना कारखान्यात बोलावण्यात आले. याबाबत मुख्य अभियंता अभिषेक सिंह यांनी सांगितले की, टर्बाइनचे काही पार्ट खराब झाले असून दुसऱ्या कारखान्यातून ते मागविण्यात आले आहेत. आगीत विद्युत केबल जळाल्या असून सुमारे साठ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आगीच्या घटनेवेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याबद्दल शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केल्याचे समजताच आमदार आदेश चौहान घटनास्थळी आले. त्यांनी शेतकरी आणि प्रशासन या दोघांशीही संवाद साधून शेतकऱ्यांची समजूत घातली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here