इथेनॉल संदर्भात २८ ऑगस्टला पुण्यात कार्यशाळा

पुणे : चीनीमंडी

पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने (व्हीएसआय) इथेनॉल उत्पादनाविषयी माहिती देण्यासाठी एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. येत्या २८ ऑगस्ट रोजी ही कार्यशाळा होणार असून, त्यात महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गुजरातमधून साखर कारखान्यांचे तब्बल २०० प्रतिनिधी सहभाग होणार आहेत. ‘इथेनॉल निर्मितीमध्ये साखर, उसाचा रस, काकवी, बी ग्रेड मळी याचा वापर कसा करावा आणि त्याचे नवे तंत्रज्ञान कोणते,’ याविषयावर ही कार्यशाळा होणार आहे. कारखान्यांमधील डिस्टलरींचे व्यवस्थापक आणि चिफ केमिस्ट यांच्यासाठी ही कार्यशाळा होणार आहे.

इथेनॉल उत्पादना संदर्भात साखर उद्योगात जनजागृती करण्याच्या उद्देशाने व्हीएसआय आणि एमआरएसएसके संघाच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले आहे. साखर उद्योगातील जाणकार या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर उपलब्ध साखर साठ्याचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी करण्यावर या कार्यशाळेत चर्चा होणार आहे. ही कार्यशाळा व्हीएसआयचे सदस्य असलेल्या डिस्टलरींना मोफत असणार आहे. त्यांचे प्रत्येकी तिघे जण यात सहभागी होऊ शकतात. इतरांसाठी नोंदणी शुल्क १ हजार ५०० रुपये असणार आहे. सकाळी दहा ते दुपारी चार यावेळेत ही कार्यशाळा होणार असून, त्यात सहभागींना चहापान आणि जेवणाची सुविधा देण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (०२०) २६९०२१०० संपर्क साधावा किंवा sanjaypatil399@gmail.com, rgodage@rediffmail.com, vandanpg@gmail.com यावर ई-मेल करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here