पुणे : पुढील तीन ते चार महिन्यांत वाहन निर्मात्यांना फ्लेक्स फ्यूएल इंजिन अनिवार्य करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. देशात स्थानिक पातळीवर उत्पादित इथेनॉल वापराकडे वाहने वळल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या अधिक वापरापासून सुटका होईल, असे ते म्हणाले. पेट्रोल आणि डिझेलचा वापर माझ्या कारकिर्दीत बंद व्हावा अशी अपेक्षा आहे. आमचे शेतकरी यासाठी इथेनॉलचा पर्याय देऊ शकतात असे ते म्हणाले.
रस्ते, परिवहन आणि राज्य मार्ग मंत्री गडकरी हे पुण्यात एका फ्लाय ओव्हरच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते. मंत्री गडकरी म्हणाले, मी पुढील तीन ते चार महिन्यांत एक आदेश जारी करणार आहे. त्यामध्ये बीएमडब्यू, मर्सिडिससह टाटा, महिंद्रा पर्यंतच्या सर्व प्रकारच्या वाहन निर्माते कंपन्यांना फ्लेक्स फ्यूएल इंजिन निर्मिती करण्यास सांगण्यात येणार आहे. बजाज आणि टीव्हीएस आदी कंपन्यांनाही आपल्या वाहनात फ्लेक्स इंजिन बसविण्यास सांगितले आहे.
ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात तीन इथेनॉल पंपांचे उद्घाटन केले होते. मी अजित पवार यांना पश्चिम महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये इथेनॉल पंप सुरू करण्यास सांगितले आहे. त्यातून शेतकरी आणि साखर उद्योगाला प्रोत्साहन मिळेल.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link