बोलीसोलापूर : महाराष्ट्राचे राजकारण हे कधी काळी साखर कारखान्याभोवती फिरत असे. पण आता परिस्थिती बदलली आहे. साखर कारखान्यांच्या माध्यमातून राजकारणाचे दिवस आता संपले असून उलट राजकारणीच आता अडचणीत येत आहेत. कारखान्यावर कर्जाचा डोंगर झाल्याने माजी उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विजय शुगर्स या साखर कारखान्याचा आज लिलाव झाला. या लिलावामुळे बँकेचे एनपीए कमी होणार आहे. मोहिते पाटील यांचे विरोधक आणि राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी हा कारखाना विकत घेतला आहे .
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याची प्रचंड राजकीय चर्चा झाली होती. अडचणीत असलेले साखर कारखाने, बँकांचे थकलेले कर्ज यामुळे सरकारचे पाठबळ राहावे यासाठी मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असेही बोलले जावू लागले. विजय शुगर्सवर 183 कोटींचे कर्ज होते. ते फेडणे शक्य नसल्याने शेवटी कारखान्याचा लिलाव करावा लागला. मोहिते पाटील यांचे राजकीय विरोधक बबनराव शिंदे यांनी हा कारखाना घेण्यासाठी सर्व शक्ती लावली होती. त्यांनी चढी बोली लावत 125 कोटीत कारखाना विकत घेतला. हा कारखाना घेण्यावरूनही राजकारण झाले.
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते-पाटील व बबनराव शिंदे हे विरोधक समजले जातात. या पाश्वभूमीवर शिंदे यांनी मोहिते-पाटील यांच्या मालकीचा विजय साखर कारखाना विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून खरेदी केल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.