ग्रामीण भागात 5 कोटी रोजगार निर्माण करणार : नितीन गडकरी

पुणे : देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात 29 टक्के वाटा सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग (एमएसएमई), तसेच खादी-ग्रामोद्योगचा आहे. या क्षेत्राच्या माध्यमातून 49 टक्के निर्यात होते, तसेच 11 कोटी लोकांना रोजगार मिळतो. आता खादी-ग्रामोद्योगची उलाढाल पाच लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे नियोजन असून, त्यासाठी अर्थमंत्र्यांनीही सहकार्याची ग्वाही दिली आहे. त्यासाठी खादी-ग्रामोद्योग आयोगावर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

गडकरी यांनी सोमवारी पुण्यातील केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्थेला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी नवल किशोर राम, संस्थेचे संचालक-प्राचार्य डॉ. संजीव राय, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय हेडाऊ, सहसंचालक डॉ. लक्ष्मी राव आदी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, शेती, ग्रामीण व आदिवासी भागात जास्तीत जास्त भांडवल गुंतवून रोजगारनिर्मिती करण्याचे ध्येय आहे. त्यामुळे नोकरीसाठी गावातून, आदिवासी भागातून शहराकडे येण्याची गरज भासणार नाही.’

सरकारी संस्थांनी केलेले संशोधन सर्वसामान्यांना पाहता यावे, तसेच या संशोधनाच्या आधारे उत्पादनाची निर्मिती करता यावी यासाठी ’एमएसएमई’ विभागातर्फे विशेष पोर्टल तयार करण्यात येणार आहे. उत्पादनांच्या मार्केटिंगसाठीही पोर्टल तयार केले जात असून, उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी टपाल विभागाशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे पुण्यातील व्यक्तीला थेट अरुणाचल प्रदेशमधील उत्पादन घरबसल्या खरेदी करता येईल, पर्यायाने शेतकरी-आदिवासी-ग्रामीण भागातील युवकांना रोजगार मिळेल, अशी माहितीही गडकरीं यांनी दिली.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here