वृद्धेश्वर कारखाना पहिला हप्ता २७२५ रुपये देणार : अध्यक्ष आप्पासाहेब राजळे

अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने नोव्हेंबर महिन्यात गळितास येणाऱ्या उसाला प्रति मेट्रिक टन २,७२५ रुपये पहिला हप्ता देण्यात येणार असून, पुढील प्रत्येक पंधरवड्यात गळितास येणाऱ्या उसाला प्रतिमेट्रिक टन पंचवीस रुपयांची वाढ दिली जाणार आहे, अशी माहिती कारखानाचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे यांनी दिली.

राजळे म्हणाले, यावर्षीच्या गळीत हंगामात सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट संचालक मंडळाने ठेवले आहे. कारखाना कार्यक्षेत्र कार्यक्षेत्राबाहेरूनही ऊस उपलब्धतेबाबत पूरक उपाययोजना सुरू आहेत. त्यासाठी ऊसतोडणी व वाहतुकीचे नियोजन केले आहे. शेतकऱ्यांना वाढीव ऊस दराचा फायदा व्हावा, असा कारखाना प्रशासन प्रयत्न करीत आहे. नोव्हेंबरनंतर येणारे अकरा पंधरवडे लक्षात घेता. वाढीव ऊस दराच्या पहिल्या हप्त्याचा लाभ २ हजार ९२५ रुपयांपर्यंत ऊस उत्पादकांना मिळू शकेल, असेही राजळे यांनी सांगितले. यावेळी संचालक राहुल राजळे, उपाध्यक्ष रामकिसन काकडे म्हणाले, इथेनॉलची चाचणी घेण्यात आली असून, आता प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. जालिंदर पवार यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र महाजन यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here