नागपूर : राज्यात यंदा उशिरा सुरू झालेला मान्सून, ऑगस्ट महिन्यात मारलेली दडी यामुळे अद्याप पावसाची नऊ टक्के तूट कायम आहे. मध्य महाराष्ट्रात २० टक्के, मराठवाड्यात २४ टक्के इतकी पावसाची तूट आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सप्टेंबरच्या अखेरीस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
‘लोकसत्ता’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, भारतीय हवामान विभागाने गुरुवारी सांगितले की, सप्टेंबरचा अखेरचा आठवडा आणि ऑक्टोबरचा पहिला आठवडा या काळात राज्यभरात सर्वत्र पाऊस कोसळेल. २८ सप्टेंबरपर्यंतच्या पहिल्या आठवड्यात मध्य भारतात सरासरीहून अधिक पाऊस राहील. त्यानंतर ५ ऑक्टोबरपर्यंत मध्य भारतात सरासरीहून जास्त पावसाचा अंदाज आहे.
या काळात राज्यातही सर्वत्र पाऊस असेल. पश्चिम बंगालच्या उपसागरात साडे सात किलोमीटर उंचीचे कमी दाबाचे क्षेत्र झारखंड आणि बाजूच्या परिसरात आहे. त्यामुळे २३ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ५ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत पावसाची शक्यता आहे. तर १२ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत कोकण विभाग आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात पाऊस कोसळेल, असे अनुमान वर्तविण्यात आले आहे.