पंधरा महिने पुरेल इतकाच पाणीसाठा

154
पुणे : प्रतिनिधी 

पुणे शहर आणि जिल्ह्यातील चार तालुक्यांना सिंचन आणि पिण्यासाठी पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला साखळी प्रकल्पातील पाणलोट क्षेत्रात काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम राहिला आहे; खडकवासला साखळीतील चारही धरणांत अवघ्या चार दिवसांत सुमारे पावणेसहा टीएमसी पाणीसाठा झाला आहे. एकूण साठा एकवीस टीएमसीवर पोहोचल्याने शहरासह जिल्ह्यातील चार तालुक्यांच्या पेयजलासह घरगुती वापर आणि सिंचन यासाठी पंधरा महिने पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे.

खडकवासला साखळी प्रकल्पात रविवारपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली. सोमवारी दिवसभर खडकवासला साखळीतील धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. याचबरोबर जिल्ह्यातील बहुतांश धरणांत संततधार सुरूच होती. खडकवासला साखळीतील टेमघर धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी सकाळी आठपर्यंत 69 आणि सायंकाळी पाच वाजेपर्यंत 60 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

सोमवारी सायंकाळपर्यंत खडकवासला साखळीमध्ये असलेल्या चारही धरणांत 20.97 टीएमसी (71.93 टक्के) पाणीसाठा झाला आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजता त्यात 5 हजार 136 क्यूसेकपर्यंत वाढ करण्यात आली.  गुंजवणी धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी सकाळी आठपर्यंत 29 आणि सायंकाळी पाचपर्यंत 27 मिलिमीटर पाऊस झाला. निरा-देवघरला सकाळ पर्यंत 67 आणि सायंकाळ पर्यंत 42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. भाटघरला सकाळ पर्यंत 17 आणि सायंकाळ पर्यंत 25 मिलिमीटर पाऊस झाला. गुंजवणीत 2.92 (74.14 टक्के), निरा-देवघर 8.27 (70.54 टक्के), भाटघर 15.72 (66.90 टक्के) आणि वीर धरणात 9.20 (97.83 टक्के) टीएमसी पाणीसाठा झाला आहे. वीर धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने सोमवारी सकाळी डाव्या आणि उजव्या कालव्यातून 2,150 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. सायंकाळी त्यात 13 हजार 716 क्यूसेक वाढ करण्यात आली असल्याचे जलसंपदा विभागातील अधिकार्यांनी सांगितले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here