साखर कारखाने जबरदस्तीने सुरू केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ : आंदोलन अंकुश

कोल्हापूर : दुसऱ्या हप्ता द्यावा आणि यंदाच्या गळीत हंगामासाठी एकरकमी ३५०० रुपये दर जाहीर करावा, या मागणीसाठी येत्या १ नोव्हेंबर रोजी शिरोळ तालुक्यात ‘आंदोलन अंकुश’च्या वतीने अंकश एल्गार रॅली निघणार आहे. कारखानदारांनी सध्या जाहीर केलेला दर आम्हाला अमान्य आहे. कारखाने जबरदस्तीने सुरू केल्यास शेतकरी प्रत्युत्तर देतील, असा इशारा आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांनी दिला. शिरोळमध्ये आयोजित आंदोलन अंकुश संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

धनाजी चुडमुंगे म्हणाले की, साखर कारखाने प्रचंड नफ्यात आहेत. मात्र, आम्ही मागणी करूनही त्यांनी दुसऱ्या हप्त्याला नकार दिला आहे. शेतकऱ्यांनीही ऊस तोडी घेऊ नयेत. आपल्या गावातून ऊस वाहतूक होणार नाही याची शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी. जादा ऊस दराच्या मागणीसाठी सर्वांनी सहकार्य करावे.

दरम्यान, साखर कारखानदारांनी ३,००० रुपये दर जाहीर करून उद्या, १ नोव्हेंबरला कारखाने सुरू करण्याची भूमिका घेतली आहे. मात्र दुसरा हप्ता न देता बळजबरीने कारखाने सुरू केल्यास जशास तसे उत्तर देऊन तो घाट उधळून लावावा, असे आवाहन चुडमुंगे यांनी यावेळी केले. उद्याच्या रॅलीमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन करण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश जगदाळे, तालुकाध्यक्ष दीपक पाटील, अक्षय पाटील, रशीद मुल्ला, विकास शेसवरे, पिंटू ढेकळे, आप्पा कदम, सुशील भोसले, शाहीर बाणदार आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here