इन्कम टॅक्स पोर्टलमधील तक्रारी आठवडाभरात दूर करू : इन्फोसिसचे अर्थमंत्र्यांना आश्वासन

नवी दिल्ली : इन्कमटॅक्स विभागाच्या नव्या वेबसाईटमध्ये करदात्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अर्थ मंत्रालय आणि पोर्टल विकसित करणारी इन्फोसिस कंपनी यांच्यामध्ये मंगळवारी बैठक झाली.

इन्कम टॅक्स विभागाने नव्याने विकसित केलेल्या वेबसाईटमधील तक्रांरींबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक झाली. यावेळी अर्थमंत्र्यांनी इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर या समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना केल्या. करदात्यांच्या सुविधा यांना आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आमचे प्रयत्न याच दिशेने आहेत असे सीतारमण यांनी सांगितले. त्यांनी हे पोर्टल युझर फ्रेंडली व्हावे यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांना दिल्या. या पोर्टलवर येणाऱ्या अडचणी या आमच्यासाठी चिंतेची बाब आहे. इन्फोसिसने लवकरात लवकर याचे निराकरण करुन आपली सेवा पुर्ववत करावी असे अर्थमंत्री म्हणाल्या.

या बैठकीला अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर उपस्थित होते. त्यांच्यासह महसूल सचिव तरुण बजाज, सीबीडीटीचे चेअरमन जे. बी. मोहपात्रा, सदस्य अनु जे. सिंह आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात सहभाग घेतला.
बैठकीत इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी सलील पारेख आणि सीओओ प्रवीण राव यांनी अर्थमंत्र्यांना इन्कमटॅक्सशी संबंधीत सर्व तक्रारी आठवडाभरात दूर केल्या जातील असे आश्वासन दिले. अनेक तक्रारी आधीच दूर केल्या आहेत असे ते म्हणाले.

यावर्षी ३१ मार्च २०२१ रोजी आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी आयकर विभागाचे ई -फायलिंग पोर्टल क्रॅश झाले होते. अशा स्थितीत सरकारने इन्कमटॅक्स विभागाच्या जुन्या पोर्टलमधील तक्रारी दूर करण्यासाठी ७ जून २०२१ रोजी नवे पोर्टल सुरू करण्यात आले होते. मात्र, त्यामध्ये तांत्रिक अडचणी येऊ लागल्या होत्या. लॉगिनसह आधार कार्ड व्हेरिफिकेशन ओटीपी, पासवर्ड आणि रिटर्न डेटा लिंक सारख्या अडचणी ग्राहकांना सतावत होत्या. पोर्टलवर ४० पेक्षा अधिक समस्या येत असल्याचे अर्थमंत्र्यांना डायरेक्ट टॅक्स प्रोफेशनल्स असोसिएशनने सांगितले होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here