हिशेब पूर्ण केला तरच यंदा उसाचा पुरवठा करू : राजू शेट्टी यांचा इशारा

कोल्हापूर : आंतराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचा दर साडेसहा हजार रुपयांवर पोहोचला आहे. देशात सध्या साखरेला किमान प्रति क्विंटल ३,८५० रुपये भाव मिळत आहे. साखर कारखाने फायद्यात असून त्यांनी शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा दिलाच पाहिजे. गत हंगामातील उसाला दसऱ्यापूर्वी किमान ४०० रुपये जादा मिळालेच पाहिजेत; अन्यथा ७ नोव्हेंबरला आम्ही जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत पुढच्या आंदोलनाची घोषणा करू. मागचा हिशेब पूर्ण केला तरच यंदा ऊसपुरवठा करू; अन्यथा एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांना ‘स्वाभिमानी’च्या मागणीचे निवेदन देऊन मंगळवारी आक्रोश यात्रेला सुरुवात झाली. शिरोळ शहरातील प्रमुख मार्गांवर आक्रोश यात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले. शिवाजी चौकात झालेल्या सभेत शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर उद्योगाचा अभ्यास करूनच अधिकच्या ४०० रुपयांची मागणी केली आहे. यावर्षी कारखानदारांकडे किमान ५०० ते ६०० रुपये शिल्लक राहत आहेत. शेतकऱ्यांना पैसे मिळावेत, यासाठी प्रत्येक साखर कारखानदारांच्या दारात जाऊन ढोल वाजून त्यांना निवेदन देणार आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक, ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, जनार्दन पाटील, माजी उपसभापती सचिन शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अजित पवार, मिलिंद साखरपे, आप्पासो पाटील, नगरसेवक प्रकाश गावडे यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here