महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाउनची घोषणा, कोरोना रोखण्यासाठी कडक नियम

76

मुंबई: महाराष्ट्रात दररोज विक्रमी संख्येने कोरोनाचे नवे रुग्ण आढळत असल्याने उद्धव ठाकरे सरकारने राज्यात नियम अधिक कडक केले आहेत. राज्यात विकेंड आणि रात्री लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. कोरोनामुळे राज्यात लॉकडाउन जाहीर होण्याची शक्यता गेल्या अनेक दिवसांपासून व्यक्त होत होती. महाराष्ट्र सरकारने कॅबिनेट बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला. ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊनऐवजी कडक निर्बंध लागू केले आहेत.

विकेंड आणि रात्रीच्या लॉकडाउनमधून परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत लॉकडाउन असेल. रात्री फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी दिली जाईल. यादरम्यान, बस, रेल्वे, रिक्षा चालवता येऊ शकतील. प्रवासी क्षमता मात्र कमी करण्यात आली आहे.

थिएटर, रेस्ट्रराँ, मॉल आणि बार पूर्णपणे बंद राहतील. जादा कर्मचारी, अभिनेते असलेल्या ठिकाणी शूटिंगला परवानगी दिली जाणार नाही. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी ही घोषणा केली आहे.

राज्यात स्थिती गंभीर
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संक्रमणाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. शनिवारी कोविड १९ चे नवे ४९,४४७ नवे रुग्ण आढळले होते. एक दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे. राज्यातील एकूण संक्रमितांची संख्या आता २९ लाख ५३ हजार ५२३ झाली आहे. तर २७७ जणांच्या मृत्यूनंतर एकूण मृतांची संख्या ५५ हजार ६५६ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ८४.४९ टक्के असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. तर मृत्यू दर १.८८ टक्के आहे. राज्यात झालेल्या २७७ मृत्यूपैकी १३२ मृत्यू गेल्या ४८ तासात झाले आहेत. यादरम्यान, ३७ हजार ८२१ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या २४,९५,३१५ झाली असून राज्यात आता ४,०१,१७२ जणांवर उपचार सुरू आहेत.


मुंबईत इमारत सील
कोरोनाची स्थिती गंभीर असल्याने राजधानी मुंबईत आतापर्यंत ६०० इमारती सील करण्यात आल्या आहेत. या इमारतींमधून कोणालाही बाहेर अथवा बाहेरून आत सोडले जात नाही. गरजेचे साहित्य इमारतीच्या गेटवर देण्यात येत आहे. चौदा दिवसांसाठी या इमारती सील केल्या आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here