पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच ब्रिडर सीड्सपासून ऊस रोपांची निर्मिती

कोल्हापूर : केंद्रीय कृषी मंत्रालय समिती आणि केंद्रीय ऊस विकास विभागाच्या केंद्रीय पथकाने शिरदवाड (ता. शिरोळ) येथे कृषिभूषण फाउंडेशनच्या ऊस रोपवाटिकेस भेट देऊन पाहणी केली. कोईम्बतूर (तामिळनाडू) येथील भारतीय कृषी अनुसंधान केंद्राच्या ऊस संशोधन संस्थेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच टिश्यू कल्चर ब्रिडर सीडसपासून तयार केलेल्या ऊस रोपांची निर्मिती येथे केली आहे. त्याची पाहणी करण्यासाठी पथकाने भेट दिली. कृषिभूषण फाउंडेशन ऊस रोपवाटिकेचे प्रमुख एल. डी. कुंभार यांनी ऊस रोपवाटीकेत हा प्रयोग यशस्वी केला आहे.

केंद्रीय पथकाचे प्रमुख विरेंद्र सिंग यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ होईल असे सांगितले. यावेळी कुंभार यांनी टिश्यू कल्चर ब्रिडर सीडसपासून ऊस रोपांच्या निर्मितीचा अनुभव सांगितला. ऊस उत्पादनात घट होण्यामागील प्रमुख कारणांपैकी सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे रोगाला बळी पडत असलेले जीर्ण पारंपारिक बियाणे होय. शेतकऱ्‍यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी दर तीन वर्षांनी बियाणे बदलणे आवश्यक आहे असे कुंभार यांनी सांगितले. यावेळी प्रगतीशील शेतकरी वसंत कुरुंदवाडे, शेखर कुंभार, राजेश पाटील (मड्डे) यांच्या शेतातील बियाणे प्लॉटची पाहणी करून मार्गदर्शन केले. जिल्हा कृषी अधिक्षक अजय कुलकर्णी, उपविभागीय कृषी अधिकारी जयश्री हावळे, कृषी पर्यवेक्षक कमाल बाणदार, कृषी सहायक सुवर्णा कोळी, सचिन कुंभार, मोहन परीट, बाळू कुंभार, विनायक परीट, राहूल कुंभार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here