युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यामध्ये पहिला बॉम्ब ब्लॅक सीजवळच्या शहरावर पडला असला तरी त्याचे पडसाद जगभरातील शेअर बाजारात उमटले. चीन, जपान, तैवानसह सर्व आशियाई शेअर बाजारात प्रचंड घसरण झाली. गुरुवारी सेन्सेक्स, निफ्टीत सकाळीच ३ ट्क्यांची घसरण झाली. मिडकॅप-स्मॉल कॅप इंडेक्सही कोसळला. गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. बाजारात घसरणीचे हे सलग सातवे सत्र आहे. ही घसरण इतकी अभुतपूर्व होती की, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे सर्व इंडेक्स २.५ ते ४ टक्के खालावले. मात्र, जाणकारांच्या मते ही बाजारात प्रवेशाची संधी आहे.
टीव्ही९हिंदी डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, यश सिक्युरिटीजचे इक्विटी हेड अमर अंबानी यांनी सांगितले की युद्धाचा आधीचा इतिहासपाहिला तर त्यानंतर बाजारात तेजी परतते. व्हिएतनाम, गल्फ, अफगाणिस्तान, इराक या युद्धात हे पाहायला मिळाले आहे. सात दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात एन्ट्रीची चांगली संधी आहे. मजबूत फंडामेंटल आणि चांगल्या मॅनेजमेंटच्या कंपन्यांचे शेअर खरेदी करता येतील. टेक्निकल अॅनालिस्ट अमित हाचरेकर यांच्या मते मार्च अखेरपर्यंत क्रूड १३० डॉलर प्रती बॅरलवर जाईल. त्यामुळे भारतासारख्या ८० टक्के तेल आयात करणाऱ्या देशासमोरील अडचणी वाढतील. मेटल, कॉपर, झिंक, लेड, निकल, अॅल्युमिनीयम अशा सर्व क्षेत्रात वाढीची शक्यता आहे. ही पोर्टफोलिओ रिबॅलन्स करण्याची संधी मानली जाते.