चंदिगढ : पंजाबमध्ये सातत्याने वाढत्या उन्हामुळे गहू उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. खरेतर फेब्रुवारी महिन्यात तापमानात किरकोळ वाढ होते. त्याचा फारसा परिणाम गहू पिकावर होत नाही. मात्र, या वर्षी थंडीच्या हवामानात तापमानात फारशी घसरण न झाल्याने आणि पावसाच्या कमतरतेमुळे गव्हाच्या दाण्यांवर, आकारावर वाईट परिणाम होईल अशी शक्यता आहे.
याबाबत अमर उजालामधील वृत्तानुसार, कपूरथला जिल्ह्यातील शेतकरी परविंदर सिंह यांच्यासह राज्यातील बहुतांश शेतकरी सध्या चिंतेत आहेत. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, सध्या गहू पिकाला कडक हवामानाची गरज नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमान खूप वाढले आहे. त्यामुळे गव्हाच्या पिकावर याचा विपरीत परिणाम होत आहे. पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यात गेल्या काही दिवसांपासून अशीच स्थिती आहे. किमान तापमानातही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. भाकियूचे महासचिव सुखदेव सिंह कोकरिकला यांनी सांगितले की, तापमानातील अचानक झालेली वाढ आणखी काही दिवस अशीच कायम राहीली तर धान्याची गुणवत्ता आणि उत्पादन यावर फरक पडू शकतो. किमान तापमानात किरकोळ घसरण झाली आहे. आणि सध्याचे तापमान ही अतिशय चिंतेची बाब आहे.