नवी दिल्ली : देशात पिक वर्ष जुलै २०२१- जून २२ या हंगामात ११.१३ कोटी टन गव्हाचे उत्पादन होईल असे अनुमान आहे. कृषी मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. गव्हाशिवाय तांदूळ, डाळी, मक्का, तेलबिया, ऊसाचे उत्पादनही विक्रमी होईल असे मंत्रालयाने म्हटले आहे.
कृषीविषयक दुसरा अंदाज जारी करताना कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले, या वर्षी एकूण अन्नधान्य उत्पादनही उच्चांकी ३१.६० कोटी टनावर पोहोचण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी ते ३१.०७ कोटी टन होते. तोमर म्हणाले की, देशातील उच्चांकी अन्नधान्य उत्पादन हे आमच्या शेतकऱ्यांनी घेतलेली कठोर मेहनत, तज्ज्ञांनी केलेले संशोधन, सरकारची शेतीपूरक धोरणे याचा परिणाम आहे. रब्बीतील मुख्य पिक असलेल्या गव्हाचे गेल्यावर्षी उत्पादन १०.९५ कोटी टन होते. तर तांदुळाचे उत्पादन यंदा १२.७९ कोटी टनापर्यंत पोहचण्याची अपेक्षा आहे यापूर्वी ते १२.४३ कोटी टन होते. डाळींचे उत्पादन २.६९ कोटी टनाच्या सर्वोच्च स्थानावर पोहोचेल. एक वर्षापूर्वी ते २.५४ कोटी टन होते. त्यातून देशातील आयात घटण्यास मदत होईल. तेलबियांचे उत्पादन ३.७१ कोटी टनाच्या उच्चांकावर पोहोचेल. गेल्यावर्षी ते ३.५९ कोटी टन होते. त्यामुळे खाद्यतेलाच्या किमती कमी होण्यास मदत मिळेल. ऊसाचे उत्पादन ४१.४० कोटी टनाच्या उच्चांकी स्तरावर पोहोचेल. गेल्यावर्षी ते ४०.५३ कोटी टन होते.