एकवीस वर्षे बंद पडलेला साखर कारखाना कधी सुरू होणार?

1102

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

मढौरा (बिहार) : निवडणुका आल्या की इथं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होतात. जाहीर सभेसाठी आलेला प्रत्येक नेता साखर कारखाना सुरू करण्याचं आश्वासन देतो. साखर कारखाना बंद होऊन २१ वर्षे झाली. त्यानंतर लोकसभा, विधानसभेच्या अनेक निवडणुका झाल्या पण कारखाना काही सुरू झाला नाही. बिहारमधील मढौरामधील जवळपास २० हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखाना सुरू होण्याची अजूनही आस आहे.

मढौरा साखर कारखाना १९०४ मध्ये सुरू झाला. त्यावेळी कारखाना परिसरातील शेतकरी मालामाल झाला होता. उसासारखे नगदी पिक घेऊन शेतकऱ्यांनी चांगले पैसे मिळवले होते. पण, १९९८ मध्ये साखर कारखाना बंद झाला आणि जवळपास २० हजार शेतकरी अक्षरशः कंगाल झाले. जणू त्यांच्या सुखाला कोणाची तरी दृष्ट लागली. गेल्या २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले. पण, तेही खोटेच ठरले.

शेतकरी कामगार देशोधडीला

कानपूर शुगर वर्क्सने १९०४ मध्ये मढौरा साखर कारखान्याची स्थापना केली. हा बिहारमधील सर्वांत जुना साखर कारखाना होता. १९९५ पासून कारखाना अडचणीत आला आणि १९९८ मध्ये अखेर बंद पडला. त्यामुळे मढौरा, अमनौर, तरैया, मशरक, पानापूर, इसुआपूर, मशरक, मकेर, परसा, दरियापूर व बनियापूर या गावांमधील ऊस शेतीच बंद झाली. जवळपास २० हजार ऊस उत्पादकांच्या हातातील शेतीच हिसकावून घेतल्याचा प्रकार झाला. तसेच दोन हजार कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. गेल्या २१ वर्षांपासून साखर कामगारांची २० कोटी रुपयांची थकबाकी आहे.

शेतकऱ्यांना हवाय कारखाना

शेतकऱ्यांनी मढौरा किसान संघर्ष मोर्चाची स्थापना केली आहे. मोर्चाचे के रविरंजन सिंह, शंकर भगवान ओझा, भगत सिंह यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना फक्त साखर कारखाना हवा आहे. इथे, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दुप्पट हमीभाव देण्याच्या केंद्राच्या घोषणेला येथे फारशी किंमत नाही. आम्हाला दुप्पट हमीभाव नको, केवळ आमची मिळकतीची हमी (कारखाना) आम्हाला परत द्यावी. कामगार नेते रामबहादुर सिंह, कौशल किशोर सिंह व ओमप्रकाश सिंह यांनी कामगारांच्या कुटुबांची परिस्थिती वाईट असल्याचे सांगितले.

आणि शेतकऱ्यांनी ऊस पेटवून दिला

२००७ मध्ये मोठा गाजावाजा करत साखर कारखाना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. वाराणसीतील उद्योगपती जवाहर जैसवाल यांना कारखाना सुरू करण्याचे निमंत्रण देण्यात आले. कारखाना क्षेत्रात मोठा कार्यक्रम झाला. तेथे शेतकऱ्यांना ऊस लागवडीचे आवाहन करण्यात आले. शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला आणि जवळपास पाच हजार एकरांत ऊस लागवड केली. पण, कारखाना काही सुरू झाला नाही. शेतकऱ्यांना त्यांचा ऊस शेतातच पेटवून द्यावा लागला. दुसरीकडे साखर कारखान्याची इमारत पडून राहिल्यामुळे तेथील साधन संपत्तीची नासधूस केली जात आहे. कारखान्याच्या विटा चोरून नेल्या जात आहेत. कारखान्याचे गेस्ट हाऊस, जीएम बंगला तेथील लाकडून चोरून नेण्यात आले आहे.

आमदार म्हणतात…

मढौरा साखर कारखान्यासाठी पंतप्रधानांनी आश्वासन देऊनही तो सुरू झाला नाही. कानपूर शुगर वर्क्सचा हा कारखाना केंद्राच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे आहे. कारखाना सुरू करण्याची जबाबादारी पूर्णपणे केंद्राची आहे, असे मत मढौराचे आमदार जितेन्द्र राय यांनी व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here