आंतरराष्‍ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या दरात घसरण, पेट्रोल-डिझेलचे दरावर परिणाम होईल?

नवी दिल्ली : आंतराष्ट्रीय बाजारात सरकार आणि देशांतर्गत तेल कंपन्यांसाठी एक महत्वपूर्ण बातमी आहे. जवळपास साडेतीन महिन्यानंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या चार दिवसांत क्रूडची किंमत ११९ डॉलर प्रती बॅरलवरुन ११३ डॉलरपर्यंत घसरली आहे. बाजारात जुलै महिन्यासाठीच्या क्रूडचा सौदा १०९ डॉलर प्रती बॅरलवर सुरू आहे. त्यामुळे दर आणखी घसरतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.

मात्र, लगेच याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होण्याची शक्यता दिसून येत नाही. जर अशीच घसरण सुरू राहिली तर पुढील किमान तीन ते पाच आठवड्यांत क्रूडचा दर १०० डॉलर प्रती बॅरलपेक्षा कमी होवू शकतात. त्यानंतर देशातील तेल कंपन्या पेट्रोल, डिझेलच्या किरकोळ विक्री दरात आणखी सवलत देवू शकतील.

जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, जागतिक क्रूड बाजारातील बेंचमार्क दाखवणाऱ्या ब्रेंट क्रूडची किंमत सोमवारी ११२.९९ डॉलर प्रती बॅरल होती. गेल्या शुक्रवारी ही किंमत ११९.१६ डॉलर तर गेल्या सोमवारी हा दर १२३.१५ डॉलर प्रती बॅरल होता. अशा पद्धतीने आठवडाभरात या दरात ७ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. भारतीय शेअर बाजारात सोमवारी गतीने झालेल्या घसरणीमागे हेच कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. क्रूडच्या किमतीमधील घसरणीसाठी जागतिक मंदीची शक्यता अधिक मजबूत होण्याचे कारण सांगितले जात आहे. खासकरुन ज्या पद्धतीने अमेरिकेच्या केंद्रीय बँकेने ०.७५ टक्के व्याज दरवाढीचा निर्णय घेतला, त्यामागे मागणी खालावल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा फटका क्रूडच्या मागणीला बसणार आहे.

दरम्यान, सरकारी पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, फक्त दोन-चार दिवसांच्या घसरणीच्या आधारावर देशातील पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीत कोणताही बदल होणार नाही. जेव्हा दीर्घ काळासाठी क्रूडची किंमत १०० डॉलरपेक्षा कमी असेल, तेव्हाच जनतेला दिलासा देणे शक्य आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कपातीनंतरही पेट्रोलमध्ये प्रती लिटर ९ रुपये आणि डिझेलमध्ये १५ रुपये प्रती लिटर तुट येत असल्याचा दावा पेट्रोलियम कंपन्यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here