आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेच्या किमती जवळपास ११ वर्षांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचल्या आहेत. त्यामुळे शुगर सेक्टरमधील शेअर्समध्ये तेजी आहे. बलरामपूर चिनीचे शेअर्स २ टक्क्यांनी वधारले आहेत. तर इतर साखरेच्या शेअर्समध्येही ५ ते १० टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.
खरेतर जागतिक मार्केटमध्ये साखरेच्या किमती ११ वर्षांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचल्या आहेत. वाढती मागणी आणि कमी पुरवठा या कारणांमुळे साखरेच्या दरात तेजी आहे. शुगर शेअर्सपैकी उत्तम शुगर्समध्ये १४ टक्के, राजश्री शुगर्समध्ये ८ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. दालमिया भारत शुगर, सिंभावली शक्ती शुगर्स, धामपूर शुगर मिल्स, बजाज हिंद चे शेअरही पाच टक्क्यांनी वाढले आहेत.
मनीकंट्रोलमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बाजारातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनला उशीर झाला असून त्याचा परिणाम साखर हंगामावर दिसून येणे शक्य आहे. साखर उत्पादनावर याचा परिणाम होवू शकतो. भारतात अल निनोमुळे दुष्काळाची स्थिती निर्माण होते. यादरम्यान महाराष्ट्र सरकारने पेरण्या थांबवण्याचा सल्ला दिला आहे. सरकारने अनुदानीत कर्जाची मर्यादा वाढवली आहे. इथेनॉल उत्पादनासाठी सरकार कर्ज देते. आता ३० सप्टेंबरपर्यंत ही मुदत करण्यात आली आहे. साखर कारखान्यांना पहिला हप्ता मिळाल्यानंतर २.५ वर्षात प्लांट उभारणी करावी लागेल.
दरम्यान आगामी काळात साखरेच्या शेअर्समधील तेजी आणखी वाढेल अशी शक्यता आहे. दरवाढ होत असल्याचे वृत्त चांगले असले तरी साखर निर्यातीस परवानगी नसल्याने हा चिंतेचा विषय आहे.