अनुराज शुगर्समध्येकामगारांचे आंदोलन

पुणे : 84 कामगारांना कामावरून काढून टाकल्याचा आरोप करत यवत (ता. दौंड) येथील अनुराज शुगर प्रायव्हेट लिमिटेडच्या कामगारांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

अनुराज शुगर्स प्रा. लि. कारखान्यात स्थायी, अस्थायी मिळून 350 हून अधिक कामगार काम करतात. वेळेवर पगार १२ टक्के पगारवाढीचा फरक, शिल्लक रजेचा पगार जादा कामाचा पगार आदी मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. आमची देणी देताच आम्ही काम सोडण्यास तयार आहोत. मात्र, कारखाना प्रशासनाने  काम करत नसल्याचे आरोप करत, ‘तुम्ही राजीनामे द्या, पुढील सहा महिन्यांत तुमची सर्व देणो अदा केली जातील,’ अशी भूमिका घेतल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. त्यामुळे आम्हाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे भीमा कामगार संघटनेचे अध्यक्ष सचिन थोरात आणि उपाध्यक्ष कैलास दौंडकर यांनी सांगितले.

अनुराज शुगर्सचे कार्यकारी संचालक डॉ. माणिक बोरकर म्हणाले कि, कारखान्यातील कामगारांच्या हिताची जपणूक करण्यासाठी राष्ट्रीय साखर कामगार संघ (इंटक) ही संघटना पूर्वीपासून येथे कार्यरत आहे. या संघटनेशी १२ टक्के पगार वाढीचा करार करण्यात आला आहे. असे असताना त्यानंतर नव्या युनियनने औद्योगिक न्यायालयात तक्रार केली असता १२ टक्के पगारवाढीव्यतिरिक्त कारखाना प्रशासनाने करारातील इतर गोष्टींवर अंमलबजावणी करू नये,  असा आदेश दिला आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. दोन्हीपैकी कोणत्या युनियनला अधिकृत मान्यता द्यायची. याबाबत न्यायालय निर्णय घेणार आहे. तो निर्णय सर्वांनी मान्य करावा, असे बोरकर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here