शिरोळमध्ये ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी साखरेचा ट्रक फोडला

कोल्हापूर : गेल्या हंगामातील उसाला अतिरिक्त प्रति टन ४०० रुपये मिळावेत, यंदाच्या उसाला जादा दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिरोळ हद्दीत ऊसतोड रोखली. याप्रश्नी कारखाना समर्थक व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. बुधवारी दुपारी कर्नाटकातून शिरोळमार्गे औरंगाबादकडे जाणारा साखर वाहतुकीचा ट्रक कार्यकर्त्यांनी फोडला.

शिरोळ तालुक्यात ऊस तोडणी आणि साखर वाहतुकीमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. काही काळ तणावाचे वातावरण होते. शिरोळ पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर हा तणाव निवळला. नृसिंहवाडी मार्गावरील मारुती मंदिरासमोर कारखान्याची ऊस तोड सुरू असल्याचे समजल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तेथे धाव घेतली. यावेळी कार्यकर्ते व शेतकऱ्यांमध्ये वादावादी, अंगावर जाऊन जाण्याचा प्रकार घडला.

यादरम्यान, साखर वाहतुकीचा ट्रक दिसताच कार्यकर्ते संतप्त झाले. कार्यकर्त्यांनी ट्रकच्या काचा फोडून काही साखर पोती रस्त्यावर फेकली. ट्रकचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. घटनास्थळी शिरोळ पोलीस ठाण्याचा फौजफाटा दाखल झाल्यानंतर तणाव निवळला. दरम्यान, आंदोलन अंकुश संघटनेनेही आपली मोहीम गतीमान केली आहे. सर्व कारखान्यांवर निवेदने दिली जात आहेत. धनाजी चुडमुंगे, दीपक पाटील, राकेश जगदाळे, उदय होगले, संभाजी शिंदे, अक्षय पाटील, दत्ता जगदाळे, भूषण गंगावणे यांच्यासह शेतकरी यामध्ये सहभागी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here