जागतिक बँकेने घटविला विकास दराचा अंदाज; भारताचा जीडीपी या वित्त वर्षात 6 टक्केच राहील

नवी दिल्ली :  जागतिक बँकेने भारताच्या यंदाच्या वित्तीय वर्षातील आर्थिक विकास दराच्या अंदाजात कपात केली असून, तो अवघा 6 टक्के असल्याचे म्हटले आहे. या आधी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही (आयएमएफ) भारताच्या विकासदराच्या अंदाजात अशीच कपात केली होती. रिझर्व्ह बँकेनेही तसाच सूर लावला होता. जागतिक बँकेने दक्षिण आशियातील देशांच्या आर्थिक स्थितीबाबत तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे की, भारताचा आर्थिक विकास दर 2021 साली 6.7 टक्के व 2022 सालापर्यंत 7.2 टक्के होण्याची शक्यता आहे.

जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांची लवकरच वार्षिक बैठक होणार असून, त्या पार्श्‍वभूमीवर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. भारताच्या आर्थिक विकास दरात सलग दुसर्‍या वर्षीही घसरण झाली आहे.  2017-2018साली भारताचा आर्थिक विकास दर 7.2 टक्के होता. त्यात घसरण होऊन 2018-19 साली तो 6.8 टक्के झाला. आता 2019-20 या सालासाठी विकास दर 6 टक्के राहील, असा जागतिक बँकेचा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या विकास दरामध्ये 0.30 टक्क्यांनी कपात करून तो 7 टक्के इतका असण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्या आधी रिझर्व्ह बँकेने देशाचा आर्थिक विकास दर 6.8 टक्क्यांवरून 6.1 इतका कमी केला होता. मात्र, कृषी उत्पादन व सेवाक्षेत्राचा झालेला विस्तार यामुळे औद्योगिक विकास दर 6.9 टक्के झाला आहे.

भारताचा आर्थिक विकास दर काहीसा मंदावला असला, तरीही जागतिक स्तरावर झपाट्याने वाढणाऱ्यां अर्थव्यवस्थांमध्ये भारताला अजूनही महत्त्वाचे स्थान आहे, असे जागतिक बँकेचे दक्षिण आशिया विभागासाठीचे प्रमुख अर्थशास्त्रज्ञ हान्स टीमर यांनी सांगितले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here