उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये घरोघरी जावून ६० टक्के गव्हाची खरेदी : मीडिया रिपोर्ट

प्रयागराज : उत्तर प्रदेश सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी, राज्यात गहू खरेदी केंद्रांची संख्या १० टक्क्यांनी वाढवून ६,४०० पेक्षा जास्त केली आहेत. हंगामात राज्यभरातील शेतकऱ्यांकडून सुरळीत गव्हाची खरेदी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, राज्य सरकारने फक्त प्रयागराज जिल्ह्यात २९३ गहू खरेदी केंद्रे स्थापन केली आणि यासाठी नऊ एजन्सी तैनात केल्या आहेत. मोबाईल खरेदी व्हॅनद्वारे शेतकऱ्यांच्या घरोघरी गहू खरेदी करण्यात येत आहे. प्रयागराजमधील ६० टक्क्यांपेक्षा जास्त गहू खरेदी या व्हॅनद्वारे करण्यात आल्याचे प्रादेशिक अन्न विपणन अधिकारी बीसी गौतम यांनी सांगितले.

उत्तर प्रदेश सरकारने २०२४-२५ या रब्बी हंगामात ६० लाख मेट्रिक टन (एमटी) खरेदीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गव्हाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) २,२७५ रुपये प्रती क्विंटल असल्याने, लक्ष्यित खरेदीसाठी शेतकऱ्यांना सुमारे १३,६५० कोटी रुपये अदा केले जातील. यावेळी राज्य सरकारने जिल्ह्यात ३.५४ लाख मेट्रिक टन गहू खरेदीचे उद्दिष्ट ठेवले असून, मागील वेळी ३.०२ लाख मेट्रिक टन गहू खरेदीचे उद्दिष्ट ठेवले होते. मार्चपासून आतापर्यंत ६,५२६ मेट्रिक टन गव्हाची खरेदी करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील खरेदीच्या हे प्रमाण पाचपट आहे. निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व खरेदी केंद्र प्रभारींना सूचना देण्यात आल्या आहेत असे बी. सी. गौतम यांनी सांगितले.

यंदा योगी सरकारने गव्हाची आधारभूत किंमत २,२७५ रुपये प्रती क्विंटल निश्चित केली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत १५० रुपये अधिक आहे. गेल्यावेळी आधारभूत किंमत २१२५ रुपये होती. आता खरेदीच्या ४८ तासांच्या आत शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात पेमेंट करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. खरेदी केंद्रावरील २० रुपये प्रती क्विंटल वजनाची रक्कमही शेतकऱ्यांना परत केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना २,२७५ रुपये प्रती क्विंटल दराने बिल खात्यावर पाठवले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here