मुंबई : महाराष्ट्रामध्ये गेल्यावर्षी उच्चांकी उत्पादन नोंदविल्यानंतर साखर उताऱ्यातील घसरणीमुळे या वर्षी राज्याच्या साखर उत्पादनात घसरण झाली आहे. अलिकडेच ऊस गळीत हंगाम समाप्त झाला. २०२२-२३ मध्ये राज्यातील साखर उत्पादन जवळपास १,०५३ लाख क्विंटल झाले आहे. २०२१-२२ मध्ये राज्यात १,२७५.३ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले होते. राज्यातील साखर क्षेत्राच्या इतिहासात गेल्या वर्षी उत्पादन सर्वोच्च होते. २०२०-२१ मध्ये साखर उत्पादन १,०६४ लाख क्विंटल झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून उसाचे लागवड क्षेत्र १४.५ लाख हेक्टर आहे. महाराष्ट्रात २०९ खासगी आणि सहकारी साखर कारखाने आहेत. त्यांनी गेल्या आठवड्यात गळीत हंगाम समाप्त केला आहे.
सहकार विभागाच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या हंगामात साखर उत्पादनातील घसरण उतारा खालावल्यामुळे आहे. सरासरी उतारा गेल्यावर्षीच्या १०.४० टक्के आणि त्याआधीच्या एक वर्षांच्या १०.५० टक्क्यांवरुन ९.९८ टक्केवर आला. पावसामुळे साखर उताऱ्यात घट झाली आहे. उसाच्या वाढीवर आणि वजनावर परिणाम झाला आहे. दीर्घ काळापासून दुष्काळी स्थिती आणि पाऊस उशीरा झाल्यामुळेसुद्धा उत्पादनात घसरण झाली आहे.
हिंदुस्थान टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखरेला इथेनॉलमध्ये बदलण्यासासाठी सरकारने प्रोत्साहन दिल्याने गेल्यावर्षीच्या १०२ लाख क्विंटलच्या तुलनेत १०६ लाख क्विंटल साखर इथेनॉलसाठी वळविण्यात आली आहे. त्यामुळे साखर उत्पादनात आणखी घसरण झाली.
साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले की, जून आणि जुलै महिन्यात पावसाने ओढ दिली होती. तेव्हा ऊस पिकाला जादा पावसाची गरज होती. त्यानंतर सलग तीन महिने, पाऊस कोसळल्याने उत्पादन घटले आहे. हे उत्पादन १,१०० क्विंटल प्रती हेक्टरवरून घटून ८८० क्विंटल प्रती हेक्टरवर आले. तरीही देशातील साखर उत्पादनात महाराष्ट्रच अग्रस्थानी राहील. कारण, उत्तर प्रदेशातील साखर उत्पादन १,०२० लाख क्विंटल होईल, अशी अपेक्षा आहे.















