कोल्हापूर : दरवर्षी ऊस तोडणीच्या हंगामात मजूर कोल्हापूर, सांगली या साखरपट्ट्यात स्थलांतर करतात. या काळात त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये यासाठी शासनातर्फे उपाययोजना केली जाते. यंदा मराठवाडा, विदर्भात दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणात बसत असल्याने कामगारांचे स्थलांतर करण्याचे प्रमाण जास्त आहे. यंदाच्या हंगामात दीड लाखांहून अधिक ऊसतोड कामगार कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात आले आहेत. गतवर्षी या दोन्ही जिल्ह्यांत १ लाख ४० हजार कामगार आले होते. गतवर्षीपेक्षा यंदा २० हजार कामगार जास्त आले आहेत. सद्यस्थितीत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात यंदाच्या ऊस गळीत हंगामासाठी ६ वर्षावरील तब्बल ३,५३६ बालके आपल्या आई-वडिलांसोबत आली आहेत मात्र, यातील अवघी १,१२२ मुलेच शाळेत जात असून उर्वरित सुमारे अडीच हजार बालके अद्याप शाळाबाह्यच असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील २३ आणि सांगली जिल्ह्यातील १६ अशा एकूण ३९ साखर कारखान्यांवर यंदा मराठवाडा आणि परराज्यातून १ लाख ५९ हजार ५९४ ऊसतोड कामगार दाखल झाले आहेत. या ऊस तोडणी मजुरांच्या मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी १ राज्य शासनाने दोन्ही जिल्ह्यांत मिळून १८ साखर शाळा उभारल्या आहेत.सहकार विभागाच्या आकडेवारीनुसार ३ हजार ५३६२ बालकांपैकी जवळपासच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये ७२९ तर साखर शाळांमध्ये अवघे ३९३ विद्यार्थ्यांचीच उपस्थिती आहे. उर्वरित अडीच हजार मुले दिवसभर फडावर खेळत राहून शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर राहात आहेत. प्रत्येक कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जाऊन मजुरांच्या मुलांची नोंदणी करण्याची जबाबदारी शिक्षण खात्याची आहे. त्यांच्याकडून यासाठी अधिकाधिक प्रयत्न होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.


















