नवी दिल्ली : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज २०२५-२६ या वर्षातील प्रमुख कृषी पिकांच्या अंतिम उत्पादन अंदाजांची आणि २०२६-२७ च्या खरीप हंगामातील पहिल्या आगाऊ उत्पादन अंदाजांची घोषणा केली. यावेळी त्यांनी देशाच्या कृषी क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरीची माहिती दिली.
दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे कष्ट आणि केंद्र सरकारच्या धोरणांमुळे भारत आज तांदूळ, कडधान्ये, ताग, भरडधान्ये (मिलेट्स) आणि मसाल्यांच्या उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
२०२५-२६ मध्ये देशाने ३,७८५.३८ लाख टन अन्नधान्य उत्पादनाचा आतापर्यंतचा सर्वाधिक विक्रम नोंदवला आहे. तर अल निनो आणि मान्सूनच्या विलंबासारख्या गंभीर हवामानविषयक आव्हानांनंतरही २०२६-२७ च्या खरीप हंगामात १,६७१.४३ लाख मेट्रिक टन अन्नधान्य उत्पादन होण्याचा अंदाज आहे. हे उत्पादन मागील पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा ९७.६७ लाख टनांनी अधिक आहे.
जागतिक कृषी क्षेत्रात भारताचा दबदबा; निर्यातीतही वाढ
पत्रकार परिषदेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, भारत आज केवळ देशांतर्गत अन्नधान्याची गरज पूर्ण करत नाही, तर जगाच्या अन्नसुरक्षेतही मोठे योगदान देत आहे. जागतिक कृषी क्रमवारीत भारत तांदूळ, कडधान्ये, ताग, भरडधान्ये आणि मसाल्यांच्या उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. तर गहू, कापूस, भुईमूग तसेच फळे आणि भाजीपाला उत्पादनात चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऊस उत्पादनात भारताचा क्रमांक ब्राझीलनंतर दुसरा आहे.चौहान म्हणाले की, देशाकडे तांदूळ आणि गव्हाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. भारतीय तांदळाला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी असून त्याच्या निर्यातीत ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. अमेरिका, कॅनडा आणि मध्यपूर्वेतील देशांसह जगभरात भारतीय बासमती तांदळाचा सुगंध पोहोचत आहे.
कडधान्ये आणि तेलबियांमध्ये आत्मनिर्भरतेवर भर; पीक विविधीकरणाला प्राधान्य
तांदूळ आणि गहू उत्पादनात अतिरिक्त साठ्याची स्थिती निर्माण झाल्यानंतर आता सरकारचे संपूर्ण लक्ष पीक विविधीकरणावर तसेच कडधान्ये आणि तेलबियांच्या उत्पादनात देशाला आत्मनिर्भर बनवण्यावर असल्याचे केंद्रीय कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले.देशात डाळी आणि खाद्यतेलांची मागणी सातत्याने वाढत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी ‘डाळी अभियान’ आणि ‘तेलबिया अभियान’ यांच्या माध्यमातून उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम अंतिम उत्पादनाच्या आकडेवारीत स्पष्टपणे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
२०२५-२६ मध्ये अन्नधान्य, कडधान्ये आणि तेलबियांच्या उत्पादनात ऐतिहासिक विक्रम
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जाहीर केलेल्या २०२५-२६ च्या अंतिम अंदाजानुसार, देशातील एकूण अन्नधान्य उत्पादन ३,७८५.३८ लाख टन इतके विक्रमी राहिले. २०२४-२५ मधील ३,५७७.३२ लाख टन उत्पादनाच्या तुलनेत यामध्ये २०८.०६ लाख टनांची वाढ झाली आहे.
तांदूळ आणि गहू : देशातील तांदूळ उत्पादन २०२४-२५ मधील १,५०१.८४ लाख टनांवरून ४९.७० लाख टनांनी वाढून विक्रमी १,५५१.५४ लाख टनांवर पोहोचले. गव्हाचे उत्पादनही २०२४-२५ मधील १,१७९.४५ लाख टनांच्या तुलनेत ४१.१९ लाख टनांनी वाढून १,२२०.६४ लाख टनांच्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचले.
मका, श्री अन्न आणि कडधान्ये : मक्याचे उत्पादन २०२४-२५ मधील ४३४.०९ लाख टनांवरून वाढून ५५०.२५ लाख टन झाले. पोषक व भरडधान्यांचे एकूण उत्पादन ७४०.८० लाख टन राहिले. त्यामध्ये ‘श्री अन्न’चे उत्पादन १७२.०९ लाख टन होते.
एकूण कडधान्य उत्पादन २०२४-२५ मधील २५६.८३ लाख टनांवरून १५.५७ लाख टनांनी वाढून २७२.४० लाख टन झाले. यामध्ये मुगाचे उत्पादन ४३.९६ लाख टनांच्या नव्या विक्रमी पातळीवर पोहोचले. हरभऱ्याचे उत्पादन १२५.१३ लाख टन, तर तुरीचे उत्पादन ३५.९९ लाख टन नोंदवण्यात आले.
तेलबिया आणि नगदी पिके : एकूण तेलबिया उत्पादन मागील वर्षातील ४२९.८९ लाख टनांवरून २.६६ लाख टनांनी वाढून विक्रमी ४३२.५५ लाख टन झाले.
यामध्ये भुईमुगाचे उत्पादन १३१.७१ लाख टनांवर पोहोचले. मागील वर्षी ते ११९.४२ लाख टन होते. म्हणजेच १२.२९ लाख टनांची वाढ झाली. मोहरी आणि रेपसीडचे उत्पादनही १२६.६७ लाख टनांवरून वाढून १३७.६६ लाख टन झाले. सोयाबीनचे उत्पादन १२६.३६ लाख टन नोंदवण्यात आले.
नगदी पिकांमध्ये उसाचे उत्पादन ५,०३७.२९ लाख टन, कापसाचे उत्पादन २८०.०६ लाख गाठी (प्रत्येकी १७० किलो) आणि ताग व मेस्ताचे उत्पादन ९४.२८ लाख गाठी (प्रत्येकी १८० किलो) राहिले.
अल निनोच्या आव्हानावर शेतकऱ्यांच्या जिद्दीने केली मात
२०२६-२७ खरीप हंगामाचे पहिले आगाऊ उत्पादन अंदाज जाहीर करताना केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांनी सांगितले की, यंदा अल निनोचे पुनरागमन, जून महिन्यात मान्सूनचे आगमन उशिरा होणे आणि ३५ ते ४० टक्के कमी पाऊस अशा परिस्थितीचा शेतीवर परिणाम झाला.
महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांसारख्या प्रमुख कृषी राज्यांमध्ये जमिनीतील ओलावा कमी झाल्याने आणि दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने भात, मका, तूर, सोयाबीन आणि कापूस यांसारख्या पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला.
मात्र, शेतकऱ्यांची जिद्द, सरकारी योजनांची अंमलबजावणी आणि शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या हवामान बदलांना तोंड देऊ शकणाऱ्या सुधारित वाणांमुळे खरीप हंगामातील एकूण अन्नधान्य उत्पादन १,६७१.४३ लाख मेट्रिक टन राहण्याचा अंदाज आहे. हे उत्पादन मागील पाच वर्षांच्या सरासरी खरीप उत्पादनापेक्षा ९७.६७ लाख टनांनी अधिक आहे.
प्रमुख खरीप पिकांचे उत्पादन अंदाज : खरीप हंगामात तांदळाचे उत्पादन १,२१९.०५ लाख टन राहण्याचा अंदाज आहे. पोषक आणि भरडधान्यांचे एकूण उत्पादन ३८१.०५ लाख टन अपेक्षित आहे. यामध्ये मक्याचे उत्पादन २६०.६४ लाख टन, बाजरी ८९.४३ लाख टन, ज्वारी १४.७९ लाख टन, नाचणी १२.४८ लाख टन आणि इतर लहान भरडधान्यांचे उत्पादन ३.७१ लाख टन राहण्याचा अंदाज आहे.
खरीप कडधान्ये आणि तेलबिया : खरीप हंगामातील एकूण कडधान्य उत्पादन ७१.३२ लाख टन राहण्याचा अंदाज आहे. यामध्ये तूर ३१.२२ लाख टन, मूग १६.५९ लाख टन, उडीद १४.४९ लाख टन आणि इतर कडधान्ये ९.०२ लाख टन अपेक्षित आहेत.
एकूण खरीप तेलबिया उत्पादन २३९.४७ लाख टन राहण्याचा अंदाज आहे. त्यामध्ये भुईमूग १११.६८ लाख टन, सोयाबीन १०२.४४ लाख टन, एरंडी १८.९७ लाख टन, तीळ ४.९१ लाख टन, सूर्यफूल १.१७ लाख टन आणि रामतिळाचे उत्पादन ०.३० लाख टन राहण्याची शक्यता आहे.
खरीप हंगामातील नगदी पिके : पहिल्या आगाऊ अंदाजानुसार, खरीप हंगामात उसाचे उत्पादन ४,५४३.३९ लाख टन, कापसाचे उत्पादन २४८.६६ लाख गाठी (प्रत्येकी १७० किलो) आणि ताग व मेस्ताचे उत्पादन ९७.०६ लाख गाठी (प्रत्येकी १८० किलो) राहण्याचा अंदाज आहे.
डिजिटल क्रॉप सर्व्हे आणि तीन स्तरांवरील वैज्ञानिक पडताळणीतून आकडेवारी तयार
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले की, हे प्राथमिक उत्पादन अंदाज आहेत. प्रत्यक्ष कापणीच्या वेळी घेतल्या जाणाऱ्या पीक कापणी प्रयोगांमधून (CCEs) मिळणाऱ्या उत्पादनाच्या आकडेवारीनंतर दुसरे आणि अंतिम अंदाज सुधारित केले जातील.दोन्ही वर्षांची आकडेवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आली आहे. यासाठी रिमोट सेन्सिंग, साप्ताहिक पीक-हवामान निरीक्षण गट (CWWG), डिजिटल क्रॉप सर्व्हे, डिजिटल जनरल क्रॉप एस्टिमेशन सर्व्हे तसेच उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली. याशिवाय तीन स्तरांवर वैज्ञानिक पडताळणी, प्रमाणीकरण आणि विविध स्रोतांमधील माहितीची तुलना करून अंतिम निष्कर्ष तयार करण्यात आले आहेत.


















