पुणे : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. २) येथे झालेल्या महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची बैठक झाली. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राच्या (ता. फलटण, जि. सातारा) येथील टेक्नॉलॉजी लॅबसह शेतकरी प्रशिक्षण केंद्र-अतिथी गृह, प्रशासकीय इमारत आणि कर्मचारी निवासस्थानांचे कामास सुमारे ४० कोटी ९१ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. विद्यापीठ कार्यकारी परिषदेच्या अधीन राहून कृषी परिषदेने यासाठी मान्यता देत निधीसाठी शासनास शिफारस केली आहे.
कृषी परिषदेच्या संचालक मंडळ बैठकीस कृषी परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, स्मार्ट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक हेमंत वसेकर, कृषी परिषदेचे शिक्षण संचालक यशवंत साळे, विस्तार संचालक धीरजकुमार कदम, संशोधन संचालक किशोर शिंदे, प्रशासनचे सह संचालक डॉ. वैभाव शिंदे यांच्यासह परिषदेचे संचालक व अन्य मान्यवर उपस्थित होते. बंगळुरूच्या युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्री सायन्सला चारही कृषी विद्यापीठातील संबंधितांनी भेटी द्याव्यात आणि तेथील शेतीसाठी चांगल्या ज्ञानाचा वापर विद्यापीठात सुरु करावा अशी सूचना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. बैठकीत बदनापूर (जि.जालना) येथील तूर कृषी संशोधन केंद्राच्या प्रयोगशाळा इमारत, शेतकरी प्रशिक्षण व निवास व्यवस्था, दाळ संशोधन संग्रहालय, प्रयोगशाळेसाठी उपकरणे, हवामान वेधशाळा, प्रक्षेत्रावर सूक्ष्म सिंचन पध्दती, शेततळी आदी विकास कामांच्या १४.३१ कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आल्यामुळे या केंद्राचाही कायापालट होण्याची अपेक्षा आहे.