पुणे : सोमेश्वर कारखाना मार्चपासून तुटणाऱ्या उसाला १०० रुपये जादा देणार – अध्यक्ष जगताप

पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची एफआरपी प्रतिटन ३२८५ रुपये आहे. मात्र, हंगामाच्या सुरुवातीपासून ३१ जानेवारीपर्यंत एफआरपीपेक्षा थोडी अधिक म्हणजे प्रतिटन ३,३०० रुपये पहिली उचल अदा केली. तर १ फेब्रुवारीपासून ज्यांचा ऊस तुटणार आहे, त्यांच्यासाठी पहिल्या उचलीसोबत प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे. त्यामुळे १ ते २८ फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या उसाला प्रतिटन ३४०० रुपये, तर १ ते ३१ मार्चपर्यंत तुटणाऱ्या उसाला ३५०० रुपये प्रतिटन असा दर शेतकऱ्यांना मिळणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी ही माहिती दिली. दरम्यान, कारखान्याने जिल्ह्यात ११.५६ टक्के इतका सर्वोच्च उतारा राखत १० लाख क्विंटल साखरनिर्मितीचा टप्पा गाठल्याचेही सांगितले.

अध्यक्ष जगताप यांनी सांगितले की, सोमेश्वर कारखान्याने आजअखेर ८ लाख ७८ हजार टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी ११.५६ टक्के तर दैनंदिन १२.५८ टक्के हा उतारा जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट आहे. कारखान्याने ७ कोटी ५५ लाख युनिट वीजनिर्मिती केली असून, ४ कोटी ९८ लाख युनिट वीजविक्री केली आहे. अल्कोहोलनिर्मिती ४४ लाख लिटर तर इथेनॉलनिर्मिती २६ लाख लिटर इतकी केली आहे. सध्या कारखान्याने ३३०० रुपये ते ३५०० रुपयांचा टप्पा गाठला आहे. दिवाळीमध्ये शेतकऱ्यांना आतापर्यंतचा ऐतिहासिक दर मिळू शकणार आहे. अन्य कारखाने एफआरपीवर किंवा केवळ उचलीवर थांबतील. दिवंगत अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वरने उत्कृष्ट आर्थिक व तांत्रिक व्यवस्थापन केले. त्यामुळे कारखान्याकडून शेतकऱ्यांना उच्चांकी दर देऊ शकेल. शेती अधिकारी बापुराव गावकवाड यांनी सध्या पूर्वहंगामी ऊसतोड सुरू झाली आहे. अकराव्या व बाराव्या महिन्यातील खोडवा संपला आहे. जानेवारीच्या तोडी सुरू करत आहोत, अशी माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here