महाराष्ट्र : ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी साखर संकुलात राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन

पुणे : राज्यातील ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी प्रायोगिक प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) राबविण्यात येणार असून, त्यासाठी साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्या आदेशानुसार येत्या सोमवारी (दि. १६) प्रशासकीय कामकाजास्तव चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. स्थलांतरित ऊसतोड कामगार आणि महिला कामगारांचे आरोग्य, कल्याण व इतर बाबींच्या अनुषंगाने कृती आराखडा तयार करून धोरणात्मक बाबींच्या करावयाच्या अंमलबजावणीचे टप्पेही ठरविण्यात येणार आहेत. साखर आयुक्तालयाच्या पुढाकाराने आणि बोनसुक्रो आणि वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्यावतीने साखर संकुलात येत्या सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता चर्चासत्र होत आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्त, समाजकल्याण आयुक्त, कामगार आयुक्त, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) व्यवस्थापकीय संचालक अजीत चौगुले यांच्यासह राज्यातील सर्व प्रादेशिक साखर सहसंचालक, सहकारी साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक व खासगी साखर कारखान्यांचे सरव्यवस्थापकांना निमंत्रित करण्यात आले आहे.

या प्रायोगिक प्रकल्पामध्ये प्रामुख्याने स्थलांतरित ऊसतोड कामगार आणि महिला कामगारांचे आरोग्य, कल्याण व त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे यावर भर दिला जाणार आहे. या प्रकल्पाचा उद्देश ऊसतोड कामगारांना स्थानिक दवाखाने आणि मोबाईल क्लिनिकद्वारे प्राथमिक आरोग्य सुविधा पुरविणे तसेच शासनाच्या आरोग्य, उपजिविका विषयक योजनांशी जोडणे हा आहे.

चर्चासत्रात बोनसुक्रो आणि ‘विस्मा’च्यावतीने प्रायोगिक प्रकल्पाचे सादरीकरण होणार आहे. शासनामार्फत सद्यः स्थतीत योजनांची अंमलबजावणी व शासकीय दृष्टिकोन यावर संबंधित विभागाचे अधिकारी बोलतील. ‘साखर उद्योगाचा दृष्टिकोन : आव्हाने व संधी’ यावर साखर कारखान्यांचे प्रतिनिधी मार्गदर्शन करणार आहेत. शासकीय यंत्रणांचा समन्वय करून कार्यवाहीची दिशा निश्चित करण्यात येईल. तसेच कृती आराखडा तयार करून प्रायोगिक प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीचे टप्पे ठरविण्यात येणार असल्याची माहिती साखर संचालक (प्रशासन) डॉ. केदारी जाधव यांनी संबंधितांना पाठविलेल्या सूचना पत्रांमध्ये नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here