पुणे :माजी खासदार सुजय विखे-पाटील यांनी पुणे येथील ओंकार ग्रुपच्या मुख्य कार्यालयाला नुकतीच भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी साखर उद्योगाच्या सद्यःस्थितीबाबत आढावा घेतला. ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील व संचालक ओमराजे बोत्रे-पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच समूहाच्या विविध प्रकल्पांची आणि भविष्यातील नियोजनाची माहिती दिली.
बैठकीत साखर व्यवसायातील उत्पादनक्षमता, ऊस उपलब्धता, बाजारातील चढ-उतार तसेच निर्यात संधी, यावर सखोल चर्चा झाली. राज्यातील साखर उद्योगासमोरील आव्हाने आणि त्यावरील संभाव्य उपाययोजनांबाबत दोन्ही बाजूंनी सकारात्मक चर्चा करण्यात आली. बदलत्या बाजारपेठेच्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादन खर्च नियंत्रण आणि शेतकऱ्यांना योग्य दर देण्याच्या दृष्टीने कोणती पावले उचलता येतील, यावर देखील चर्चा झाली. या वेळी सुजय विखे पाटील यांनी साखर उद्योग हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, उद्योग आणि शेतकरी यांच्यात समन्वय साधून शाश्वत विकास साधणे आवश्यक असल्याचे सांगितले. ओंकार ग्रुपकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. बाबूराव बोत्रे-पाटील यांनी साखर क्षेत्रात नव्या संधी निर्माण करण्यासाठी समूह कटिबद्ध असल्याचे सांगितले.


















